सोलापूर : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न देणाऱ्या साखर कारखान्यावर आरआरसी कारवाई केली आहे. त्यात तडवळ येथील गोकुळ माऊली शुगर्स या कारखान्याचे नाव आहे. यादीतील नाव नजर चुकीने समाविष्ट झाल्याचे निवेदन कारखान्याचे चेअरमन सीए व्ही. पी. पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
यंदाच्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या उत्पादकांची एफआरपीची ४० टक्के पेक्षा अधिक थकीत रक्कम देय असलेल्या राज्यातील १३ साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी आर. आर. सी. कारवाईचे आदेश जारी केले आहेत. या कारखान्यांच्या यादीत गोकुळ माऊली शुगर्सचे नाव असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. मात्र गोकुळ माऊली शुगर्सने २८ फेब्रुवारी २०२१ अखेरच्या एफआरपी अहवालानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६३.३५ टक्के एफआरपीची रक्कम अदा केली आहे. गाळप अहवालात तशी स्पष्ट नोंद आहे. प्लांट कोड चुकीचा असल्याने यादीत तशीच माहिती नमूद केल्याचे दिसते.
गाळप अहवालानुसार अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची थकीत रक्कम अद्यापही अदा केली नाही. ४० टक्के ते ६५ टक्के दरम्यानची एफआरपी रक्कम काही कारखान्यांनी दिलेली आहे. त्यांचीही नावे यादीत समाविष्ट नाहीत. तर बऱ्याच कारखान्यांनी संपूर्ण हंगामातील एक टक्का रक्कमही अदा केली नाही. तरीदेखील अशा कारखान्यांवर आर. आर. सी. कारवाई केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ही यादी सदोष असल्याचे साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. सुधारित यादी लवकरच प्रसिद्ध होईल. गोकुळ माऊली शुगरचे नाव नजरचुकीने आल्याचे साखर आयुक्तांना निवेदनाद्वारे कळविण्यात आल्याची माहिती चेअरमन पाटील यांनी दिली.