पंढरपूर : गरिबांचा देव समजल्या जाणाऱ्या पांडुरंग व रुक्मिणी मातेला भाविकांनी आजपर्यंत २८ किलो सोने व ९९६ किलो चांदी दान केली आहे. सोन्या-चांदीच्या विटा बनविण्याची परवानगी दिली, तर समितीला जतन करणे सुलभ होणार आहे. मात्र, प्रस्तावाकडे विधि व न्याय विभागाने दुर्लक्ष केल्याने सोने-चांदी पोत्यात बांधून ठेवण्याची वेळ आली आहे.पांडुरंगाच्या भक्तांकडून आपापल्या इच्छेनुसार व कुवतीनुसार लहान सोन्याचे मणी, अंगठ्या, नथ, मंगळसूत्र, चेन अशा विविध प्रकारचे दागिने देवाच्या दक्षिणा पेटीत अर्पण केले जातात. पांडुरंगाच्या दक्षिणा पेटीतील दक्षिणेची मोजणी होताना, त्या दक्षिणापेटीत बहुतांश वस्तू, दागिने आढळून येतात. त्याचबरोबर काही भक्त १ ग्रॅम, २ ग्रॅमच्या सोने-चांदीच्या वस्तू थेट मंदिरात येऊन पावती करून जातात. भाविकांनी श्रद्धेने आणि प्रेमाने अर्पण केलेल्या लहान-लहान वस्तू कायमस्वरूपी देवाच्या खजिन्यात राहाव्यात यासाठी दोन वर्षांपूर्वी मंदिर समितीने या वस्तू वितळवून सोने आणि चांदीच्या विटा करण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात समितीने विधि व न्याय विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. हा प्रस्ताव दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या २८ किलो सोने आणि ९९६ किलो चांदीच्या हजारो वस्तू पोत्यात बांधून ठेवायची वेळ मंदिर समितीवर आलेली आहे.
विठ्ठलाच्या चरणी आलेले साेने, चांदी दुर्लक्षामुळे पोत्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:35 AM