आप्पासाहेब पाटील, सोलापूर: जागतिक बाजारातील डॉलरच्या संख्येत झालेली घट आणि विविध देशात निर्माण झालेल्या मंदीच्या सावटामुळे सोने-चांदीचे दरात दिवसेंदिवस वाढत होत आहे. या दरवाढीमुळे लग्नसराईसाठी अनेक ग्राहकांना भारदस्त सोनं खरेदी करताना चांगलीच मुरड घालावी लागत आहे. एवढेच नव्हे तर सोन्याच्या दरात वाढ झाली असून, दर कमी होण्याच्या आशेने अनेक ग्राहक वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.
दरम्यान, आहे ते सोनं ठेवून नवीन सोन्याचे दागिने तयार करण्याकडे कल वाढला आहे. सोलापूर शहरात छोटे, मोठे असे एकूण २ हजारांपेक्षा अधिक ज्वेलर्सची दुकाने आहेत. मागील दीड महिन्यात सोने - चांदीचा दर ७ ते ८ हजारांनी वाढला आहे. भविष्यात पुन्हा ७ ते ८ हजार रुपयांनी सोने - चांदी महागणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या सोन्याचा दर वाढल्याने खरेदी कमी झाल्याचे चित्र सराफ बाजारात दिसून येत आहे. भविष्यात सोने-चांदीचे भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. मंदीचे सावट अन् डॉलरमध्ये होणारी वाढ यामुळे पुढील पाच वर्षे तरी सोने-चांदीचे भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ग्राहकांनी आताच सोने-चांदीची खरेदी करावी, असे आवाहन संजय औरंगाबादकर यांनी केले आहे.
सध्या सराफ बाजारात २४ कॅरेट, २२ कॅरेट, २१ कॅरेट, १८ कॅरेट, १४ कॅरेट अशा विविध कॅरेटमध्ये सोने मिळते. मात्र, या कॅरेटचे दर वेगवेगळ्या स्वरुपात आहेत. सोलापुरातील औरंगाबाद ज्वेलर्समध्ये २२ कॅरेट सोन्याचे दर ५४ हजार एवढे आहे. मात्र, हाच दर शहरातील विविध ज्वेलर्सकडे वेगवेगळा आहे.
असे आहेत सोने-चांदीचे दर (२४ कॅरेट)
- सोने - ५८ हजार ६०० हजार (१० ग्रॅम)
- चांदी - ७० हजार ८०० रूपये (१ किलो)
अर्थसंकल्पात सोने - चांदीवरील आयात शुल्कात कपात केल्याने भविष्यात सोने - चांदीचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. साधारण: ५२ ते ५५ हजारांपर्यंत सोन्याचा दर होईल. भविष्यातील दरवाढीचे संकेत मिळत असल्याने दागिने बुकिंग करण्याची सुविधा आहे. -भीमाशंकर करजगीकर, ज्वेलर्स विक्रेते
सोने - चांदीचे भाव वाढत असल्याने आहे ते दागिने देऊन सोने तयार करून घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अर्थसंकल्पात सोने - चांदी व्यवसायाला दिलासा देणारा कोणताही निर्णय घेतला नाही. पुढील काही वर्षे तरी दरात घसरण होण्याची शक्यता कमीच आहे. -संजय औरंगाबादकर, ज्वेलर्स विक्रेते