सोलापूर : सोन्या-चांदीचे दागिने बनवायचे आहेत, त्यांच्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असंही म्हटलं जात आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत आज ३०० रुपयांनी घसरून ४७,४५० रुपये झाली आहे, तर गेल्या चार महिन्यांत सोने - चांदीची खरेदी करण्याऐवजी गोल्ड क्वाईन म्हणून सोने घेऊन गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, असे सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
घर, जागा घेतल्यानंतर अर्थव्यवस्थेची मंदी, जमीन घोटाळे होतात म्हणून गोल्ड क्वाईन्स, गोल्ड आणि दागिने घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. एकूण गुंतवणुकीच्या पाच ते दहा टक्के गुंतवणूक सोन्यात करणं योग्य राहील. बाजार कोसळल्यानंतरही सोन्याचा दर वाढतो. बाजार पूर्ववत झाला तरी सोन्याचा दर आहे तितकाच राहतो. त्यामुळे सोन्यात कमी जोखीम आहे, असे गुंतवणूक एक्स्पर्टदेखील सांगतात.
विवाहाचा खर्च कमी झाल्याने गुंतवणूक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाहावर निर्बंध आल्याने विवाहाचा खर्च कमी झाला. यामुळे राहिलेल्या पैशाची सोन्यात गुंतवणूक करताना दिसत आहेत. पारंपरिक पद्धतीप्रमाणेच सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटे, वेढणी, डायमंड, गोल्ड फंड, गोल्ड ईटीएफ, सोव्हेरन गोल्ड बाँड यामध्ये गुंतवणूक केली जात आहे.
--
नऊ महिन्यांतील सोन्याचे दर
- जानेवारी- ५०,२१८
- फेब्रुवारी- ४८,३६४
- मार्च - ४५,१७६
- एप्रिल - ४४,१९०
- मे -४६,७५३
- जून - ४९,३१९
---
२,७६८ रुपये स्वस्त मिळते सोने
जानेवारी महिन्यात सोन्याचे दर ५०,२१८ रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. आज सोन्याचा दर ४७,४५० रुपये प्रतितोळा आहे. त्यानुसार आज सोन्याचे दर २,७६८ रुपये प्रतितोळ्याने स्वस्त आहेत. २००८ नंतर चांदीचे दर वाढले. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्यात काही खास बदल झालेच नाहीत. २०१८ मध्ये सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली. आजचा एक किलो चांदीचा दर ६५,००० रुपये आहे.
कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्यासारख्या सुरक्षित पारंपरिक गुंतवणूक प्रकाराला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच मागील वर्षभरात सोन्याच्या गुंतवणुकीत मोठी वाढ होताना दिसते आहे. सोने हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय समजला जात आहे.
- मिलिंद वेणेगूरकर, सराफ व्यापारी