सोलापूर : २७ ते ३० सप्टेंबर रोजी आठव्या आशियाई योगासन स्पर्धेत सोलापूरची श्रुती पेंडसे-केसकरला २५ ते ३५ वयोगटात वैयक्तिक योगासन प्रकारात सुवर्णपदक प्राप्त झाले. या स्पर्धा भारतात, केरळ, तिरुवनंतपुरम येथे पार पडल्या.
यात योग फेडरेशन आॅफ इंडियाच्या भारतीय संघात वैयक्तिक योगासन स्पर्धेसाठी मागील वर्षी गाझियाबाद उत्तर प्रदेश येथील राष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरीवरून तसेच धर्मस्थळ येथील २ फेडरेशन कप स्पर्धेतील कामगिरीवरून अर्जेन्टिना येथील जागतिक तसेच केरळमधील आशियाई स्पर्धेत निवड करण्यात आली होती. यामध्ये सोलापुरातील श्रुती पेंडसे केसकर व रक्षा गोरटे या दोघींची निवड झाली होती.
आशियाई स्पर्धेत १५ देशातील ५०० स्पर्धकांनी विविध वयोगटात भाग घेतला होता. यात श्रुतीला २५ ते ३५ वयोगटात वैयक्तिक योगासन प्रकारात सुवर्णपदक प्राप्त झाले. तसेच रक्षाचा १७ ते २१ वयोगटात ५ वा क्रमांक आला. श्रुती गेली १६ वर्षे व रक्षा १० वर्षे या स्पर्धात भाग घेत असून आतापर्यंत दोघीनीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांसह चमकदार कामगिरी करत, सोलापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. श्रुती बी ई, एम बी ए असून रक्षा फिजिओथेरपी च्या दुसºया वर्षात शिकत आहे. या दोघीनाही स्नेहल पेंडसे, राष्ट्रीय योगासन पंच व प्रशिक्षक आणि योग शिक्षक, आयुष मंत्रालय, यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.