अक्षय आखाडे
कोर्टी: गतवर्षीच्या कांद्याच्या तुलनेत यंदा अतिवृष्टी आणि करपा रोगानं रोपं टिकेनाशी झाली... मग काय अनेकांना दोन-तीन वेळा बियाणं विकत घ्यावं लागलं... काहींनी तर पाहुण्यांकडे शेतात कांदा बियाणे टाकून रोपं तयार केली. त्यातच अतिवृष्टीमुळं गुलाबी कांद्याला सरासरीपेक्षा अधिक उतारा मिळाला नाही. त्यामुळं यंदा उन्हाळी कांद्याला हमखास चांगला भाव मिळेल, अशी आशा धरून बसलेल्या शेतकºयांना कोरोना संसर्गामुळे ‘लॉकडाउन’ जाहीर झालं अन् बाजारपेठा बंद झाल्या. हजार रुपये खर्च करूनही हा कांदा विकावा कुठं? असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. नफा तर सोडाच, ओतलेला पैसा तरी निघेल का? अशी आर्जव बळीराजा करू लागला आहे.
सोलापूर जिल्ह्यात अनेक तालुक्यातील शेतकरी उसासारख्या पिकांच्या नादी न लागता नगदी उत्पन्न मिळणारं पीक म्हणून कांद्याकडे पाहतात. मात्र अलीकडे झालेली अतिवृष्टी आणि त्यापाठोपाठ कोरोनाच्या रूपाने आलेल्या महामारीमुळे पुरतं आर्थिक गणित कोलमडलं आहे. अतिवृष्टीत गुलाबी कांद्याचे उत्पादन सरासरीपेक्षा अधिक न निघाल्याने चांगला भाव मिळेल, या आशेवरच अनेकांनी उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात केला.
कांदा पिकाला बियाण्यापासून खते, खुरपणी, काढणी, कापणी आणि वाहतूक असा खर्च येतो. तरीही यंदा मोठ्या प्रमाणात लागवड झाली. अडचणीच्या काळात निव्वळ आशेवर कांदा बियाणे घेतले व उन्हाळी कांद्याची लागवड केली. आता अनेकांच्या शेतात उन्हाळी कांदा तयार झाला आहे. काही ठिकाणी तर काढून ढीग पडला आहे. पण आता बाजारपेठाच बंद असल्यामुळे तो कुठे नेऊ विकायचा हा प्रश्न शेतकºयांपुढे ‘आ’ वासून उभा आहे.
दरवर्षी करमाळा तालुक्यातील बहुतांश भागात उन्हाळी कांदा केला जातो. यंदा देखील तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे क्षेत्र आहे. तालुक्यातील गुलाबी कांद्याने यंदा पुणे बाजारपेठेत चांगलाच भाव खाल्ला होता. उन्हाळी अथवा गावरान कांद्याला भाजीपाल्याबरोबर चांगली मागणी असते. आज उन्हाळी कांदा काढला. परंतु दरवर्षी सहज विक्री होणाºया कांद्याचा यंदा लॉकडाउनमुळे चांगलाच वांदा झाला आहे. पुणे, सोलापूर, वाशी, नगर, नाशिक येथील बाजारपेठेत कांद्याला चांगली मागणी असते.
यंदा या बाजारपेठेबरोबरच ग्रामीण भागातील आठवडा बाजार सुद्धा बंद आहेत. संचारबंदीमुळे कांदा शेतातच पडून आहे. कोरोनामुळे हमाल नसल्याने मार्केट कमिटी यांचा लिलाव चालत नाही. मार्केट चालू झाले तरी गोण्या भरून आणा, असे आडमुठे धोरण मार्के टमधून सुरू केले. यामुळे गोण्या भरून गाडीत भरण्यापर्यंतचा खर्च परवडत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मागच्या कांदा उत्पादनाचा विचार करता नफा तर सोडाच, पण झालेला खर्चदेखील निघेल की नाही, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे.
एकूणच सर्वच दिशांनी शेतकºयांवर कोरोना संसर्गाचे सावट पसरले आहे. यातून लवकरात लवकर सुटका व्हावी, अशी प्रार्थना गावोगावचे शेतकरी करू लागले आहेत.
कोरोनानं बिघडवलं : शेतकºयांचं गणित- लोक डाऊन मुळे शेतकरी वगार्ला मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतीचे अर्थकारण बिघडून गेले आहे . येत्या खरीप हंगाम बिघडण्याची चित्र दिसत आहेत. लॉक डाऊनचा सामना शेतकरी मोठ्या हिमतीने करत असला तरी आगामी खरीप हंगामाची चिंता भेडसावत आहे रब्बी पिके काढून झाली की शेतकरी खरीप पिकासाठी मशागतीवर लक्ष देतात. मशागत करून याच काळात शेतकरी खते, बी बियाणे शेती करण्यासाठी लागणारा खर्च याचे नियोजन करत असतो. मात्र कोरोना मुळे लॉक डाऊनचे संकट उभे राहिले आहे.
शेतकºयांचा स्वत: कांदा काढण्याकडे भर- अपुरे मनुष्यबळ असले तरी लॉकडाउनच्या काळात कोणत्याच शेतमालाची विक्री झाली नसल्याने शेतकºयांना पैशाची चणचण भासू लागली आहे. लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने मजुरीसाठी पैसे खर्च करण्याची ऐपत उरली नाही. म्हणूनच स्वत: घरच्या घरी कांदा काढणीवर शेतकरी भर देत आहेत. काही जण कांदा साठवणूक करून कोरोना गेल्यावर तरी दोन रुपये भाव जादा मिळेल, या आशेवर नजर ठेवून आहेत.
एक एकर कांदा केला. कोरोनामुळे कांद्याची काढणी लांबली आहे. काढलेला कांदा बाजारपेठ बंद असल्यामुळे विकायचा कुठे असा प्रश्न आहे. शेतमालाची विक्री होत नसल्यामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित चुकत आहे.- भर्तरीनाथ अभंग, कांदा उत्पादक कोर्टी