मागील सोमवारच्या ‘दुनियादारी’ मधील ‘मेरी जिंदगी एक कटी पतंग’ या लेखाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक वाचकांनी फोन केले. नुकसानभरपाईची रक्कम नाकारणारी ती दु:खदा अनेकांना भावून गेली.
वकिली व्यवसायात ४३ वर्षांत मला अनेक चित्र-विचित्र स्वभावाची माणसे बघायला मिळाली. प्रत्येक खटल्याकडे मी एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो. जगात वाईट स्वभावाची माणसे आहेत, तेवढीच चांगल्या स्वभावाचीदेखील आहेत. फौजदारी खटल्यात व नुकसानभरपाईच्या खटल्यात माणसांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे बघायला मिळाले. मागील कोर्ट स्टोरीमधील ती दु:खदा तिला पतीच्या अपघाती निधनाबद्दल नुकसानभरपाईपोटी मिळणाºया चेककडे ढुंकूनदेखील बघायला तयार नव्हती. याच्या उलट नुकसानभरपाईच्या पैशासाठी माणूस किती विचित्रपणे वागतो हे बघून धक्का बसतो. डोक्याला चमन गोटा केलेले एक गृहस्थ बायकोच्या अपघाती मृत्यूबद्दल नुकसानभरपाईचा खटला दाखल करण्यासाठी कागदपत्रे घेऊन आले होते.
१३ दिवसांपूर्वीच त्याची बायको अपघातात वारली होती. सकाळीच त्यांनी १३ वा दिवस केला होता. बायको कमवती नव्हती. मी त्यास म्हणालो, ३० ते ४० हजारांपेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही. तो म्हणाला, एक लाख रुपयांचा दावा करु. योगायोगाने नुकसानभरपाईच्या दाव्यापोटी द्यावयाची नोटीस पहिल्याच तारखेला विरुद्ध बाजूला बजावली गेली. पुढच्याच आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील पहिले लोकन्यायालय बसले. सर्वांना खूप उत्साह होता. लोकन्यायालयाच्या दिवशी इन्शुरन्स कंपनीने नुकसानभरपाईबद्दल मागितलेले एक लाख रुपये देण्यास हरकत नाही असे सांगितले. चारच दिवसात नुकसानभरपाईचा धनादेश त्यास मिळाला. आठ-दहा दिवसानंतर तो भेटायला आला. त्याच्याबरोबर एक बाई होती. तिच्या वेशभूषेवरुन ती नववधू दिसत होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी लग्न केले होते. तो म्हणाला, नुकसानभरपाईची रक्कम कामी आली. त्यात लग्न उरकले. बघा वाचकहो, अशी ही दुनियादारी. पहिल्या बायकोच्या अपघाती मृत्यूच्या नुकसानभरपाईची रक्कम दुसरी बायको आणण्यासाठी !
एका पक्षकाराच्या बायकोच्या अपघाती मृत्यूबद्दल नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा अर्ज आम्ही दाखल केला होता. बायकोच्या मृत्यूनंतर त्याने दुसरे लग्न केले होते. त्यांचे काही पटले नाही. माहेरी जाऊन तिने नवºयाविरुद्ध पोटगीचा खटला दाखल केला. कोर्टाने तिला मंजूर केलेली पोटगी त्याने भरली नसल्याने कोर्टाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होते. ते रद्द करण्यासाठी त्यास पैशाची गरज होती. त्यासाठी तो पहिल्या बायकोच्या अपघाती मृत्यूबद्दलची रक्कम मिळण्यासाठी गडबड करत होता. पहिल्या बायकोच्या मृत्यूच्या नुकसानभरपाईची रक्कम दुसºया बायकोची पोटगी भरण्यासाठी गडबड करणारा नवरा ! कशी आहे बघा ही दुनियादारी ! एका पक्षकारावर त्याच्या बायकोने पोटगी मिळण्यासाठी कोर्टात खटला दाखल केला होता.
नवरा-बायको कोर्टातदेखील कचाकचा भांडत असत. एकेदिवशी तो सांगत आला, बायको अपघातात खलास झाली. बायको मरण पावल्याच्या दु:खाचे कसलेही लवलेश त्याच्या चेहºयावर दिसत नव्हते. तो म्हणाला, वकीलसाहेब, आता पोटगीचा खटला रद्द होणार ना? मी त्यास म्हणालो, होय! त्याने त्याच्या मित्राच्या हातावर टाळी दिली आणि मित्राला म्हणाला, चल आज माझ्याकडून तुला पार्टी! एक महिन्यानंतर तो व त्याचा मित्र परत आॅफिसला आले. तो म्हणाला, वकीलसाहेब बायको अपघातात वारल्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्यासाठी अर्ज करायचा आहे. मी त्यास म्हणालो, अरे तुझी बायको तुझ्याकडे राहत नव्हती. तुमचे भांडण होते. कोर्टात पोटगीची केस होती. तो म्हणाला, वारण्यापूर्वी एका आठवड्याअगोदरच आम्हा नवरा-बायकोची तडजोड झाली व ती नांदायला आली असे लिहू. मला त्याच्या लोभी स्वभावाचा राग आला. मी त्यास खडेबोल सुनावून हाकलून दिले. नंतर तो न्यायालयाच्या परिसरात दुसºया वकिलासोबत दिसत असे. वाचकहो, बघा अशी ही दुनियादारी!
याउलट उस्मानाबादला एका सामान्य परिस्थितीतील शेतकºयाचा तरुण वकील मुलगा अपघातात वारला. त्याच्या अपघाती मृत्यूबद्दल मिळालेली संपूर्ण रक्कम त्या शेतकरी दांपत्याने स्वत: न घेता उस्मानाबाद वकील संघाच्या वाचनालयाला देऊन टाकली ! अशी ही देखील चांगली दुनियादारी. वाचकहो जगात वाईट लोक आहेत. तेवढेच चांगलेदेखील आहेत. भगवंताने पाठवलेल्या या चांगल्या लोकांच्या चांगुलपणामुळेच या जगाचे रहाटगाडगे नीटपणे चालू आहे हेच खरे. - अॅड. धनंजय माने(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)