उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा गावाशी तसा तुळजापूर तालुक्यातील गावांचाही संपर्क आहे. लगतच्या गावांतील नागरिकांची व्यवहाराच्या निमित्ताने वडाळ्यात वर्दळ असते. दवाखान्याच्या निमित्ताने १० ते १५ गावांतील नागरिक वडाळ्यात येतात. अगोदर आरोग्य केंद्र तर आता ग्रामीण रुग्णालयाची सुविधा येथे शासनाने केली आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयात केवळ डाॅक्टर व कर्मचाऱ्यांसाठीच आहे का, असे इथले चित्र आहे. सकाळी साडेनऊनंतर हळूहळू एक-एक कर्मचारी येण्यास सुरुवात होते व बरोबर साडेबाराच्या ठोक्याला केसपेपर बंद होतात. रक्त, लघवी तपासणी तर येथे नावालाच केली जाते. संपूर्ण सुरक्षित कीट परिधान केलेल्या डाॅक्टर पेशंटला दरवाजात उभे करून काय त्रास आहे, असे विचारतात. डाॅक्टर व पेशंटच्या मध्ये स्टूल ठेवलेला व किमान सात फूट अंतर असते. ठराविक गोळ्या लिहून दिल्या की डाॅक्टरचे काम संपते. या उलट वडाळ्यातील खासगी रुग्णालयाचे चित्र आहे. केवळ तोंडाला मास्क लावलेले डाॅक्टर अगदी जवळून, अंगाला हात लावून पेशंट तपासणी करतात. शिवाय पेशंट बरा होईल असे इंजेक्शन व औषधे दिली जातात. त्यामुळे पेशंट बरे होतात. त्यामुळे बहुतांशी लोक खासगी उपचाराला प्राधान्य देताना दिसत आहे.
............
विस्कळीतपणा आला आहे. लोकांच्या तक्रारी आहेत. यापूर्वी दोन वेळा सूचना दिल्या, मात्र सुधारणा झाली नाही. उद्या एक वेळ सांगून बघतो अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करतो.
- बळीराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
............
तक्रारी आल्या आहेत. यापूर्वी सूचना दिल्या आहेत. नव्याने सूचना देतो. डाॅक्टरांनाही वारंवार सांगावे लागते. मधल्या काळात डाॅक्टर कुटुंब कोरोना पाॅझिटिव्ह आले होते.
- डाॅ. प्रदीप ढेले, सिव्हिल सर्जन