सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील प्रवाशांना एक दिलासा देणारी बातमी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन (एनएचएसआरसी)ने मंगळवारी जाहीर केली़ सोलापूर विभागातून मुंबई-पुणे-हैदराबादमार्गे धावणाऱ्या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या पहिल्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे़ मात्र हायस्पीड ट्रेन सोलापूर रेल्वे स्थानकावर थांबविण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा झाल्यानंतरच निश्चित सांगता येईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, ११११ किमी लांबीच्या मुंबई-पुणे-हैदराबाद या मार्गावर हायस्पीड ट्रेन चालविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे़ याबाबतची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, निविदानुसार डीपीआरसाठी नेमलेल्या कंत्राटदाराला ओव्हरहेड, भूमिगत आणि भूमिगत उपयुक्तता ओळखण्यासाठी, त्याचबरोबर वेगवान रेल्वेसाठी लागणारा विजेचा पुरवठा, उपकेंद्रांसाठी वीज उपलब्धतेचे पर्याय या टेेंडरमधून समोर येणार आहे़ टेंडरनुसार मार्ग सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारशी समन्वय साधला जाणार असल्याचेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या चर्चेनंतर स्थानकांची होणार निश्चिती...
मुंबई-पुणे-हैदराबाद या हायस्पीड ट्रेनबाबतची निविदा १ नोव्हेंबर रोजी उघडण्यात येणार आहे. शिवाय ५ नोव्हेंबर रोजी त्यासंदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले़ मार्ग सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाशी समन्वय साधून विचारविनिमय करून कोणत्या स्थानकावर हायस्पीड ट्रेन थांबवावी, याबाबत निर्णय होणार आहे़ सध्या मुंबई ते हैदराबाददरम्यान सर्वात वेगवान रेल्वेगाडी हुसेनसागर एक्स्प्रेस आहे जी १७ तास १० मिनिटात हैदराबादमध्ये पोहोचते़
सोलापूर रेल्वे स्थानक हे कर्नाटक, आंध्रप्रदेश, मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे़ मुंबई ते हैदराबाद या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक म्हणून सोलापूर स्थानकाचा नामोल्लेख होतो़ हायस्पीड ट्रेनला सोलापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा, यासाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशनसोबत पत्रव्यवहार करणार आहे़ हायस्पीड ट्रेनचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना व्हावा, यासाठी जे जे करावे लागेल ते ते करायला तयार आहे़
- डॉ़ जयसिद्धेश्वर महास्वामी,
खासदार, सोलापूर