गणेश पोळ, टेंभुर्णी : उजनी पाणलोट क्षेत्राच्या भिमा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कळमोडी, वडिवळे, खडकवासला ही धरणे ५० टक्के पेक्षा जास्त भरली असून पानशेत व कासारसाई ४० टक्के पेक्षा जास्त भरली आहेत. उजनीकडे येणाऱ्या बंडगार्डन व दौंड विसर्गात वाढ झाली असून सोमवारी सकाळी ८ वा. बंडगार्डन येथून १३ हजार ८३० क्युसेक तर दौंड येथून १२ हजार ५२४ क्युसेक विसर्ग उजनी धरणात सुरू आहे. दौंड येथील विसर्गात वाढ झाल्याने उजनी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्यास सुरूवात होणार आहे.
सोमवार दि. १५ रोजी सकाळी ८ वाजता उजनी धरणाची पाणी पातळी वजा ३३. ५२ टक्के एवढी झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून भिमा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने उजनी वरील १९ धरणांचा पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १९ पैकी ३ धरणांचा पाणीसाठा ५० टक्के पेक्षा जास्त झाला आहे. कळमोडी ७६.५९, वडिवळे ७२.७२, खडकवासला ६४.७५ टक्के भरली आहेत. तर पाणशेत ४४ टक्के, कासारसाई ४१.५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. निरा खोऱ्यातील गुंजवणी ५० टक्के भरण्याचा मार्गावर असून या धरणाची टक्केवारी ४२.८५ टक्के झाली आहे.
भिमा खोऱ्यातील वडीवळे धरण क्षेत्रात १०५ मिमी, पवना ८१, मुळशी ६३, टेमघर ६३, कासारसाई ४०, वरसगांव ३४ व पानशेत ३५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तर निरा खोऱ्यातील गुंजवणी ३२ मि.मी. निरा देवघर ३८ मिमी. अतिवृष्टी झाली आहे. यावर्षी प्रथमच बंडगार्डन येथून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला असून यामुळे सायंकाळ पर्यंत दौंड विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सध्या उजनी धरणात ४५.७ टिएमसी पाणीसाठा झाला आहे.