अप्पासाहेब पाटील
सोलापूर - मोहोळ-कामती, कणबस-तांदुळवाडी, टेंभुर्णी-पंढरपूरसह अन्य तीन ते चार रस्ते विकास कामांना केंद्राने मंजुरी दिली आहे. यासाठी ३२३ कोटी ८१ लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी प्रगती का हायवे हा हॅशटॅग वापरून रविवारी दिली.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय, तसेच राज्य महामार्गांच्या कामासंदर्भात मोठी घोषणा केली होती. राज्यभरातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी जाहीर करण्यात आल्याचे गडकरी यांनी ट्विटरवरून सांगितलं होते. मात्र, त्यावेळी सोलापुरातील रस्ते कामांचा समावेश नव्हता. दरम्यान, रविवारी गडकरी यांनी ट्वीट करून सोलापूर जिल्ह्यातील मंजूर रस्ते कामांसह मंजूर निधीची माहिती दिली आहे. यामध्ये खास करून अन्य राज्यांना जोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश असल्याचे चित्र दिसत आहे.
ही आहेत सोलापूर जिल्ह्यातील मंजूर कामे...
- - टेंभुर्णी-पंढरपूर-मंगळवेढा-उमदी ते कर्नाटक सीमा (विजापूर) मार्गाचे मजबुतीकरण- ७० कोटी ६७ लाख
- - टेंभुर्णी-कुसळंब विभागातील सध्याच्या कॅरेजवेचे मजबुतीकरण व रुंदीकरण - १५७ कोटी ७२ लाख
- - सोलापूर-हैदराबाद मार्गावरील सोलापूर शहराजवळ असलेल्या जमखंडी पुलाच्या कामासाठी - २ कोटी ८३ लाख
- -सोलापूर-विजापूर महामार्गावरील पुलाच्या कामांसाठी - ३ काेटी ९८ लाख
- -पाटस-बारामती-इंदापूर-अकलूज-सांगाेला-जत विभागातील रस्ते कामांचे मजबुतीकरण - १० कोटी ३७ लाख
- - कुसळंब-येडशी विभागातील बार्शी-येडशी-मुरूड-लातूर-रेणापूर-उदगीर-देगलूर-सरगोली या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी - ४९ काेटी १२ लाख
- -सोलापूर-विजापूर महामार्गावरील दुहेरीकरणाच्या चौपदरीकरणातील अन्य कामासाठी - २९ कोटी १२ लाख
सोलापूर जिल्ह्यात रस्ते कामांचे जाळे विस्तारले...
मागील काही वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील रस्त्याचे जाळे चांगलेच पसरले आहे. सोलापूर-पुणे, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-विजापूर, सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-अक्कलकाेट, सोलापूरमार्गे जाणारा रत्नागिरी -नागपूर आदी विविध रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. काही मार्गाचे मजबुतीकरण व विस्तारीकरणही झाले आहे. याचपैकी काही रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.