सुजल पाटील
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक साहित्याच्या माध्यमातून मध्य रेल्वेने माल वाहतुकीच्या माध्यमातून ३.६४ कोटींचे उत्पन्न मिळवले. ११५२ टन औषधांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून कोरोना वॉरियर्स म्हणून अधिकारी, चालक व अन्य टीमने आपले योगदान दिल्याचे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी सांगितले.
भारतात कोविड-१९ या देशभर पसरलेला साथीचा आजार रोखण्यासाठी सर्व नियमित प्रवासी रेल्वे सेवा रद्द केल्या आहेत. तथापि, विशेष गाड्या चालविण्याव्यतिरिक्त देशभरातील जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी मालगाड्या (फ्रेट) आणि पार्सल गाड्या धावत आहेत. दरम्यान ५ जून २०२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, कल्याण, नागपूर, भुसावळ, सोलापूर, पुणे आणि नाशिक ते नागपूर, सिकंदराबाद, चेन्नई आणि शालिमार येथे जाण्यासाठी विविध ठिकाणी ९७५५ टन जीवनावश्यक वस्तू पार्सल गाड्यांमधून पाठविल्या आहेत. लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आल्यामुळे गरज लक्षात घेता शालिमार व चेन्नईसाठी पार्सल गाड्या ३० जूनपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
हा माल पाठविला पार्सल गाडीद्वारे...- या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी ३३३६ टन खाद्यपदार्थ / पेरीशेबल आणि ५०८० टन हार्ड पार्सलची वाहतूक केली आहे. या साथीच्या आजारात औषधे/फार्मा उत्पादनांचा पुरवठा करणे हे देखील एक आव्हानात्मक काम होते. या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने ११५२ टन औषधे / फार्मा उत्पादनांची वाहतूक केली आहे. या विशेष पार्सल गाड्यांद्वारे झालेल्या वाहतुकीत ९७ टन पोस्टल / आरएमएस बॅग आणि ८९ टन ई-कॉमर्स उत्पादनांचा समावेश आहे.
लॉकडाऊन कालावधी वाढविल्यानंतर मध्य रेल्वेने पुढील पार्सल रेल्वे गाड्यांची वाहतूक ३० जून अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ००११३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शालिमार ही ३० जूनपर्यंत तर ००११४ शालिमार- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल ट्रेन २ जुलैपर्यंत नियमित धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई सेंट्रल पार्सल रेल्वे गाडी खालील वेळेनुसार वाडी - सिकंदराबाद - विजयवाडामार्गे चालविण्यात येतील. ००११५ व ००११६ या पार्सल गाड्या दोन्ही दिशेने लोणावळा, पुणे, सोलापूर, वाडी, सिकंदराबाद, विजयवाडा येथे थांबतील.- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग.