माळशिरस : कोरोनाची दहशत तालुक्याच्या सरहद्दीनजीक येऊन ठेपल्यामुळे सर्वजण भीतीच्या सावटाखाली आहेत. यातच जिल्ह्याबाहेरून येणाºया व्यक्तींना १४ दिवसांसाठी प्रशासनाच्या मदतीने गावांच्या शाळांमध्ये अलगीकरण करून ठेवत आहेत. या महामारीत गुरसाळे (ता. माळशिरस) येथील तरुणांनी एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. क्वारंटाईन कालावधीत त्यांनी गावकºयांच्या मदतीने शाळेचे रंगकाम, परिसराची स्वच्छता या गोष्टी हाती घेत समाजसेवेची संधी गवसण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे गुरसाळे ग्रामसमितीने प्रशासनाच्या मदतीने जिल्ह्याच्या बाहेरून येणाºया लोकांना शाळेत क्वारंटाईन करून ठेवले होते. मात्र, पेशाने रंगकाम करणाºया तरुणाने शाळेला रंग देण्याची कल्पना गावकºयांसमोर मांडली. त्यानंतर राहुल जगताप, तलाठी समाधान पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, ग्रामसेवक सचिन गोरे, शाळेचे शिक्षक यांच्यासह गावकºयांनी लोकवर्गणी करून रंग उपलब्ध करून दिला. बघता बघता शाळेचे रूप पालटू लागले. त्यामुळे इतरांनीही आर्थिक स्वरूपात मदतीचा हात पुढे केला. जागतिक महामारीच्या संकटातही क्वारंटाईन नागरिक व गावकरी यांचे नाते दृढ झाले आहे.
मदत मागणाºया तरुणाने केली मदत- दत्तात्रय रणदिवे यांना आपल्या मुलाच्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी पुण्यात राहिल्यामुळे गावात आल्यानंतर क्वारंटाईन होण्याची वेळ आली होती. तर लोकांना मदतीची याचना करुन लहान मुलावर उपचार करीत आहेत. अशातही या तरुणाने आपला वेळ शाळेच्या कामासाठी घालविला.
जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटाईन ठेवताना साहजिकच एकमेकांविषयी तिरस्काराची भावना निर्माण झाली होती. परंतु, नियमानुसार त्यांना क्वारंटाईन झाल्यानंतर पुन्हा गावकरी व त्यांच्या सुसंवादामुळे गावाच्या विकासासाठी एकजुटीने शाळेच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले.- राहुल जगताप, गुरसाळे