सोलापूर : जिल्ह्यातील अकरा लसीकरण केंद्रावर 1100 जणांना उद्या शनिवारी लस दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.
जिल्हा कृती दल समितीची आज बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी लसीकरण तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा लस समन्वयक डॉ. अनिरुध्द पिंपळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अकरा केंद्रावरील सर्व आवश्यक व्यवस्था आज तपासून घ्यावी. नियुक्त कर्मचारी आणि लसटोचक यांना पुन्हा एकदा आवश्यक सूचना द्याव्यात. लसीकरण केंद्रावर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असेल, आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. सर्व केंद्रावर इंटरनेटची व्यवस्था करण्यात यावी. वीज पुरवठा सुरळीत राहील याकडे महावितरण कंपनीने लक्ष द्यावे.
यावेळी पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते, श्री. शिवशंकर, श्री. स्वामी यांनी तयारीची माहिती दिली. जिल्ह्यात आठ केंद्रावर तर शहरात तीन केद्रांवर प्रत्येकी 100 जणांना लस दिली जाणार आहे. लस दिली जाणाऱ्या प्रत्येकास लसीकरणाची वेळ कळवली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेत विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. लसीचे डोस जिल्हा भांडार केंद्रातून आज सायंकाळी प्रत्येक लसीकरण केंद्रावर पाठवले जातील.
बैठकीस अश्विनी रुग्णालयातील डॉ. राजेंद्र पुली, डॉ. अभिजीत जिरगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, डॉ. राजेश चौगुले आदी उपस्थित होते.
ही आहेत सोलापुरातील लसीकरण केंद्रे....
ग्रामीण 8 - ग्रामीण रुग्णालय,अक्कलकोट, ग्रामीण रुग्णालय, बार्शी, उपजिल्हा रुग्णालय, करमाळा, उपजिल्हा रुग्णालय,अकलूज, ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, ग्रामीण रुग्णालय सांगोला, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय , कुंभारी.
शहर 3- दाराशा, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अश्विनी सहकारी रुग्णालय, सोलापूर.