सोलापूर : डिझेलचा वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि एस. टी.ला फायद्यात आणण्यासोबतच प्रवाशांना चांगली सुविधा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यभरातील विविध मार्गांवर इलेक्ट्रॉनिक बसेस सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सोलापुरातून दोन मार्गांवर इलेक्ट्रॉनिक बस सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी एस. टी. महामंडळाने नुकतेच टेंडर मागविले आहे.
एस. टी. महामंडळाकडून राज्यभरात जवळपास १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेत. ज्या मार्गाने एस. टी.चे जास्त उत्पन्न आहे, अशाच मार्गांवर या इलेक्ट्रिक बस सोडण्यात येणार आहेत. सोलापुरातून सोलापूर - पुणे या मार्गावर १० बसेस आणि सोलापूर - विजापूर - सोलापूर या मार्गावर पाच बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन्ही मार्गांसह राज्यातील अन्य १७ विभागांतून इलेक्ट्रिक गाड्या सोडण्यात येणार आहेत.
सोलापूर - पुणे या जवळपास अडीचशे किलोमीटर अंतरावर सोलापूर - पुणेसाठी पाच गाड्या आणि पुणे - सोलापूरसाठी पाच अशा एकूण दहा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, सोलापूर - विजापूर - सोलापूर या मार्गासाठी पाच गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
या सर्व गाड्या या ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिस आज अर्थात जीसीसी पद्धतीने करार करण्यात येणार आहे. यासाठी आठ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
सोलापूरसह सात ठिकाणी असणार गाड्यांची चार्जिंग व्यवस्था
राज्यभरातील विविध मार्गांवर १०० इलेक्ट्रिक गाड्यांचे नियोजन महामंडळाकडून करण्यात आले आहे. या गाड्यांच्या चार्जिंगसाठी ७
ठिकाणी चार्जिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नांदेड या ठिकाणी या चार्जिंगची व्यवस्था केली जाणार आहे.
या मार्गांवर ही धावणार इलेक्ट्रिक बसेस
औरंगाबाद पुणे, पुणे नाशिक, कोल्हापूर पुणे, सोलापूर पुणे, पुणे महाबळेश्वर, पुणे सातारा, कोल्हापूर बेळगाव, सोलापूर विजापूर, औरंगाबाद नांदेड, औरंगाबाद शिर्डी, नागपूर भंडारा, नाशिक शिर्डी या मार्गांवर १०० इलेक्ट्रिक बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी टेंडर मागविण्यात आलेले आहे.