सोलापूर : जिथे माणसाला साफसफाई करताना खूप त्रास होतो. यामध्ये मॅनहोल, गटार विहिरी, स्ट्रॉमवॉटर मॅनहोल्स, तेलकट पाण्याची गटार यासारख्या मर्यादित जागांचा समावेश आहे. तेथे अत्याधुनिक पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी बॅंडीकूट रोबोटिक मशीनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या रोबट मशीनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे.
सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज व “मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स ॲक्ट २०१३” नुसार गटार आणि सेप्टिक टाक्यांची धोकादायक साफसफाई ही प्रतिबंधित करण्यात आली आहे. सेप्टिक टॅंक व भूमीगत गटारांच्या धोकादायक स्वच्छता करताना शून्य मृत्यूची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिका आयुक्त शितल उगले – तेली यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.
या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिके कडून आज भूमीगत गटारांच्या धोकादायक स्वच्छता अत्याधुनिक पद्धतीने करणे कामी बॅंडीकूट रोबोटिक मशीनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, कार्यकारी अभियंता तथा सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड, सहा. अभियंता रामचंद्र पेंटर तसेच सर्व विभागीय अधिकारी तसेच आवेक्षक व बॅंडीकूट रोबोटिक कंपनीकडून सागरिका देबनाथ, श्रीपदा सुभेदार उपस्थित होते.