सोलापूर : सर्वसामान्य जनतेला स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी तसेच अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला लगाम लावण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार पंढरपूर तालुक्यातील उंबरे, गुरसाळे, चळे या नदी तीरावरील ठिकाणांवर वाळू उपसा करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना अल्प दरात वाळू उपलब्ध होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार असल्याचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील उंबरे, गुरसाळे, चळे याठिकाणी वाळू साठा करण्यासाठी संबंधित गावच्या शासकीय जागा, तसेच ज्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार खाजगी जागा भाडे तत्वावर उपलब्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना या ठिकाणाहून स्वस्त दरात वाळू मिळणार आहे.
वाळूची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक अवजड वाहनांची माहिती खनीकर्म विभागाकडे राहणार आहे. तसेच वाळूची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर जीपीएस प्रणालीद्वारे तालुका व जिल्हा प्रशासन लक्ष देणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वाळू डेपोसाठी पंढरपूर तालुक्यातील उंबरे गुरसाळे आणि चळे या नदी काठावरील ठिकाणांवरून वाळू उपसा होणार असल्याचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी सांगितले.