सोलापूर : शहरातील जड वाहतुकीला कंटाळलेल्या सोलापूरकरांसाठी एक खूशखबर आहे. केगाव ते साेरेगाव चारपदरी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. या २१ किलोमीटर बायपासचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के काम लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे शहरातील निम्मी जडवाहतूक कमी होणार असून जडवाहतुकीमुळे घडणाऱ्या अपघातांची संख्याही घटेल. धूळ आणि रस्त्याचे नुकसानही कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर बायपासचे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करा, अशी अपेक्षाही सुज्ञ सोलापूरकर व्यक्त करताहेत.
शहरातील जडवाहतूक कमी करण्याच्या दृष्टीने बाळे ते हत्तूर अर्थात केगाव ते सोरेगाव या २१ किलोमीटर बायपास रस्त्याला पाच ते सहा वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. त्यानंतर बासपास रस्त्याचे काम वेगाने सुरू झाले. शहराच्या बाहेरील जडवाहतूक बाहेरूनच जाण्यासाठी रिंग रोडची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शहराच्या चारही दिशेला बायपास रस्त्याची सोय झाल्यास महामार्गावरील जडवाहतूक बाहेरूनच जातील. शहरात जडवाहनांचा शिरकाव न झाल्यास शहरातील प्रदूषण कमी होईल. धूळ कमी होईल. जडवाहतुकीमुळे रस्त्याचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होते. मुख्य म्हणजे अपघात थांबतील.
बायपास रस्त्यामुळे काय होईल
पुणे महामार्गावरून येणारी सर्व वाहने केगाव या बायपास रस्त्याने विजापूरकडे जातील. तसेच विजापूर तसेच बंगलुरू येथून येणारी वाहने सोरेगाव बायपास रस्त्याने पुणे किंवा हैदराबादकडे जातील. यासोबत हैदराबाद हायवे तसेच तुळजापूर महामार्गावरून येणारी वाहने केगाव बायपास रस्त्याने विजापूरकडे जातील.
आंतरजिल्हा आणि आंतरराज्य संबंधित जडवाहतूक शहरात येऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. बायपास रस्ता सुरू झाल्यानंतर आरटीओ आणि पोलिसांनी जडवाहतुकीचे नियोजन करावे. त्यापूर्वी सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत जडवाहतूक पूर्वीप्रमाणे पूर्ण बंद करा. सध्या बारा ते चारदरम्यान जडवाहतूक सुरू आहे. त्यामुळे शहराच्या बाहेर जडवाहनांची मोठी रांग लागत आहे. यामुळेही सोलापूरकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अशोक इंदापुरे, सामाजिक कार्यकर्ते
.....................