सोलापूर - प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सुविधांसाठी मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील प्रशासनाने गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार १ मार्चपासून सोलापूर-पुणे-सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस पुढील आदेश येईपर्यत धावणार असून या गाडीचे सर्व कोचेस आरक्षित असणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, ही गाडी सोलापूर स्थानकावरून आठवड्यातून पाच दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार रोजी सकाळी ६.३० वाजता सुटणार असून १०.३० वाजता पुण्यात पोहोचणार आहे. शिवाय पुण्यातून ही गाडी ६.१० वाजता सुटणार असून रात्री १० वाजता सोलापूर स्थानकावर आगमन होणार आहे. ही गाडी कुर्डूवाडी, दौंड स्थानकावर काही वेळ थांबणार आहे.
या गाडीला एकूण १६ कोचेस असणार आहेत. कोरोना संदर्भात राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकावर प्रवाशांना करावा लागणार आहे, अन्यथा रेल्वे प्रशासनाकडून संबंधित प्रवाशांना दंड आकारण्यात येईल असेही प्रशासनाने कळविले आहे. हुतात्मा एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वे संघटना, लोकप्रतिनिधींनी केली होती, त्याचा विचार रेल्वे प्रशासनाने घेऊन ही गाडी सुरू केल्याचे सांगितले.