सोलापूर : डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणीची प्रयोगशाळा तयार झाली आहे. या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञाची पदे भरण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठपुरावा केला असून, त्यांच्या मान्यतेनंतर सोलापुरातच स्वॅब (नमुना) टेस्टींग होणार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात विविध ठिकाणी व्हायरल रिसर्च डायग्नोसिस लॅब सुरु करण्याची घोषणा केली होती. सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आठ एप्रिलपर्यंत प्रयोगशाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत; मात्र त्या आधीच प्रयोगशाळा सुरु होणार आहे. महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत व्हीआरडीएल (व्हायरल रिसर्च डायग्नोसिस लॅब) ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये विभागाकडून ५० लाख ३५ हजार रुपये देण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेमध्ये बायोसेफ्टी कॅबिनेट, रेफ्रिजरेटेड हाय स्पीड सेंन्ट्रीफ्युज थर्मल सायकलर, जेल डॉक्युमेंटेशन सिस्टीम अँड जेल इलेक्ट्रोफोरेसीस, रेफ्रिजरेटेड मायक्रोफ्युजरिअल टाईम पीसीआर मशीन, ८० व्हर्टिकल अल्ट्रा लो फ्रिजर, अॅटोमेटेड एलायजा मायक्रो प्लेट वॉशर, अॅटोमेटेड एलायजा मायक्रो प्लेट वॉशर या नऊ यंत्रांचा समावेश आहे.
या प्रयोगशाळेमध्ये कोरोना संशयित रुग्णाच्या घशातून स्टीकने स्वॅब (नमुना) घेण्यात येतात. आरटीपीसीआर मशीनमध्ये तपासणीसाठी नमुने टाकताना जंतू मरणार नाहीत तसेच इतर जंतू वाढणार नाहीत याचीदेखील काळजी घेण्यात येते. या यंत्राद्वारे फक्त कोरोनाच नव्हे तर स्वाईन-फ्लू, चिकन गुनिया, डेंग्यू या आजारांसाठीचे निदान करता येऊ शकते. या यंत्राद्वारे शरीरामध्ये व्हायरसची किती संख्या आहे, हेदेखील कळते. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना याचा लाभ होणार आहे. तसेच पुण्यातील प्रयोगशाळेतून अहवालची प्रतीक्षा संपणार आहे.
कोरोना आजार संबंधित उपचारासाठी महाविद्यालय व रुग्णालयाकडून सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे. महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा तयार झाली आहे. येत्या तीन ते चार दिवसात ही प्रयोगशाळा सुरु होईल. यामुळे रुग्णाच्या स्वॅबचा अहवाल लवकर मिळेल.- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेज.