मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यासह तालुक्यात अक्षरशः हाहाकार माजवला होता. अनेक लोकांना आपल्या आप्तेष्ठांना गमवावे लागले होते. मात्र आता ही लाट वेगाने ओसरत चालली आहे. अशात मंगळवेढा तालुक्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. २ लाख ५ हजार लोकसंख्या असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात आता केवळ २९ रुग्णसंख्या आहे
तालुक्यात तब्बल ६२ गावं कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात १७ गाव कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेला धीर मिळाला आहे. तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याची संक्रमण साखळी खंडीत करण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे . यासाठी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले. .कोरोनाने दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात थैमान घातले होते . त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना राबवत सर्वत्र कडक लॉकडाऊन सुरू केले.
मंगळवेढा तालुक्यात प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे, बीडीओ सुप्रिया चव्हाण, डॉ नंदकुमार शिंदे,वैद्यकीय अधिकारी प्रमोद शिंदे ,डॉ धनंजय सरोदे ,डॉ दत्तात्रय शिंदे ,डॉक्टर संजय कांबळे, डॉ वर्षा पवार ,डॉ भीमराव पडवळे ,डॉ श्रीपाद माने , फार्मसी ऑफीसर सी .वाय .बिराजदार ,हणमंतराव कलादगी, विस्ताराधिकारी प्रदीपकुमार भोसले यांच्या सह तालुक्यातील सर्व आरोग्य सेवक , तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी याची कडक अंमलबजावणी केली. पोलीस व महसूल विभागाच्या खांद्याला खांदा देत येथील आरोग्य विभागही जिवाची बाजी लावताना दिसत आहे.
या कठिण परिस्थितीत कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, बोराळे, मरवडे , आंधळगाव, सलगर, भोसे, या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा कार्यरत होती. वाडीवस्तीवरील घरोघरो जावून विविध उपाययोजना राबवत जनसामान्यांत जनजागृती केली आहे. गावागावातील प्रत्येक नागरिकाला लसीकरणाचा पहिला डोस कसा देता येईल याचे योग्य नियोजन करत पहिल्या टप्यातील लसीकरण पूर्ण केले आहे.सध्या गावोगावी उभारलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी करत ग्रामस्तरीय दक्षता समितीसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. विलगीकरण कक्षातील कोरोना बाधितांवर वेळोवेळी औषधोपचार करत गावोगावी राबवलेल्या इतर उपाययोजनामुळे कोरोनाची संक्रमण साखळी खंडित झाली आहे. आज संपूर्ण तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा---
तालुक्याची लोकसंख्या २ लाख ५ हजार २१४ जणांपैकी ८२ हजार ८०९ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ८ हजार ७४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यात ३ खासगी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्यामुळे ८ हजार ३५८ जणांना जीवदान मिळाले. या कोविड सेंटरमुळे नागरिकांचा सुमारे कोट्यावधी चा वैद्यकीय खर्च वाचला असण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.प्रशासनाने २१ हजार ६७२ नागरिकांचे लसीकरण केले आहे. १५ जूनपासून तीनही कोविड सेंटर बंद झाली आहेत. मंगळवार दि १५ जून रोजी ग्रामीण रुग्णालयसह पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या २३५ अँटिजेंन चाचणीत एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही त्यामुळे सध्याची आकडेवारी पाहता जून महिना अखेर कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरणार आहे.