सोलापूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने खासगी प्रयोगशाळेला स्वॅबची चाचणी करण्यास मान्यता दिली आहे. या चाचणीसाठी साडेचार हजार रुपये इतका खर्च येणार आहे. याकरिता पुणे व मुंबई येथील खासगी प्रयोगशाळेला मान्यता देण्यात आली आहे.
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) खासगी लॅबमध्ये कोरोना विषाणू कोविड -१९ चाचणी संदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीतील दर निश्चितीनुसार खासगी लॅबमध्ये कोविड -१९ चाचणीच्या तपासणीसाठी जास्तीत जास्त ४ हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. संशयिताच्या स्क्रीनिंगसाठी १ हजार ५०० रुपये तर निदानाची पुष्टी करणाºया रिपोर्टसाठी ३ हजार रुपये आकारले जाणार आहेत.
आयसीएमआरद्वारे (इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च) कोविड -१९ च्या उपचारासाठी अधिकृत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खासगी लॅबमध्ये तपासणी करता येणार आहे.
सोलापुरात फक्त स्वॅब गोळा केले जाणार असून ते पुणे व मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. शहरात फक्त छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) कोविड चाचणीची प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. खासगी प्रयोगशाळेला मान्यता मिळाल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय स्वॅब तपासणी नाही- आजारी असलेला किंवा ज्याला कोरोना झाल्याची शंका असेल तो व्यक्ती खासगी हॉस्पिटलमध्ये जाईल. डॉक्टर त्या रुग्णाची तपासणी करुन हिस्ट्री विचारेल. त्या रुग्णाची कोविडची चाचणी करावी असे डॉक्टरांना वाटल्यास ते या खासगी प्रयोगशाळेची मदत घेतील. सोलापूर ते पुणे हे अंतर चार ते पाच तासांचे आहे. याकाळात रुग्णाचे स्वॅब घेऊन ते पुण्याच्या प्रयोगशाळेत पोहोचविण्यात येईल. तिथून २४ तासामध्ये स्वॅबचा अहवाल डॉक्टरांना दिला जाणार आहे. कंपन्या या त्यांच्या सोयीनुसार रोज किंवा एक दिवसाच्या अंतरानंतर सोलापुरातून स्वॅब घेऊन जातील.
ज्या रुग्णाचा स्वॅब टेस्ट होईल तोपर्यंत त्याला रुग्णालयातच थांबावे लागणार आहे. खासगी प्रयोगशाळेतून मिळालेल्या अहवालाची माहिती महापालिका जिल्हा प्रशासनाला दिली जाणार आहे. त्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यास त्याला कोणत्या रुग्णालयात उपचार द्यायचे हे त्यावेळची परिस्थिती पाहून ठरविण्यात येणार आहे.- डॉ. प्रदीप ढेलेजिल्हा शल्यचिकित्सक