सोलापूर - सिद्धेश्वर एक्स्प्रेससह इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा विशेष एक्स्प्रेसचा दर्जा काढल्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाने सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सर्वसाधारण बोगीतील आरक्षणाची अट रद्द केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, प्रवाशांना आता मेल,एक्स्प्रेसच्या जनरल डब्यांतून अनारक्षित तिकिटावर प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्य लोकांचा रेल्वे प्रवास आता स्वस्त होणार आहे. मात्र त्यासाठी प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचेही रेल्वे मंत्रालयाने सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी जनरल डब्यांवर असलेले निर्बंध हटवून त्यातून जनरल तिकिटावर प्रवास करण्याचा नियम पूर्ववत करण्याची मागणी करीत होते. रेल्वेच्या अनेक संस्था, प्रवासी संघटना व लोकप्रतिनिधी यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयास पत्रव्यवहार देखील केला होता. अखेर ती मागणी रेल्वे मंत्रालयाने मान्य करून रेल्वेच्या जनरल डब्यांवरील निर्बंध दूर केले आहेत.
------
बुकिंग तारखेसाठी घातली अट...
रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या जनरल डब्यांवरील निर्बंध दूर केले असले तरी त्यासाठी नो बुकिंग डेटसाठी अट टाकलेली आहे. सध्या जनरल डब्यातून देखील आरक्षित तिकिटावर प्रवास केला जात आहे. ज्या दिवशी डब्यात आरक्षण नसेल, तेव्हापासूनच अनारक्षित तिकिटावर प्रवास करता येणार आहे. त्यामुळे जनरल डब्यातून अनारक्षित तिकिटावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
--------
आता प्रवास होणार स्वस्त...
काही दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर व डेमू गाड्यांसाठी जनरल तिकीट व सिझन पाससाठी मुभा दिली होती. आता मेल, एक्स्प्रेसच्या गाड्यात जनरल डबे जोडून त्यात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून ही सेवा बंद होती. जनरल तिकीट बंद झाल्याने प्रवाशांना आरक्षित तिकीट काढून प्रवास करणे महागात पडत होते. आता सर्वसामान्य लोकांचा रेल्वे प्रवास स्वस्त होणार आहे.
--------
जनरल डब्यातून प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य लाेकांना मुभा द्यावी या मागणीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांना निवेदन दिले होते. त्यासंदर्भात चर्चाही झाली होती. आमच्याबरोबर इतर जिल्ह्यातील संघटनांनी देखील ही मागणी केली होती. या सर्वांच्या मागणीला यश आले आहे.
- संजय पाटील, रेल्वे प्रवासी संघटना, सोलापूर