सोलापूर - शहरातील इयत्ता ९ वी पासून पुढील कोचिंग क्लासेस आणि सर्व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी परवानगी दिली आहे. यासाठी या संस्थांवर काही अटी घालून देण्यात आल्या आहेत.
कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने १२ जानेवारी रोजी तयार केला होता. या आदेशावर आयुक्तांनी २० जानेवारी रोजी सही केली. प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील लाईट हाऊस, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, टायपिंग व संगणक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता ९ वी पासून पुढील कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी असेल. या संस्थांनी विद्यार्थ्यांची थर्मल गनव्दारे नियमित तपासणी करावी. मास्कचा वापर बंधनकारक राहील. सर्व संस्थांमधील प्रशिक्षक व व्यवस्थापन कर्मचारी यांची कोवीड १९ साठीची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी.
प्रशिक्षण संस्थांनी हॉलमध्ये सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील. दोन प्रशिक्षणार्थींमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यात यावे, असे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.