बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : रेडझोन मध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या कापडी पीपीई किटचे सोलापुरात उत्पादन सुरू झाले आहे. सदर कापडी पीपीई किट वॉशेबल असून रोज सॅनिटाइजर करता येईल.
हॉस्पिटल परिसरात तसेच रेड झोन एरियात काम करणारे आशा वर्कर्स, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य तपासणी कर्मचारी, वाहन चालक या सर्वांना सदर पीपीई किट खूप उपयुक्त राहणार आहे. पुण्यातून या किटला मागणी येत आहे अशी माहिती अतुल स्पोर्ट्स गारमेंट्स अतुल लोंढे-पाटील यांनी 'लोकमत' ला दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक सुरक्षाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन पोटतिडकीने केले आहे. देशभरातील नागरिकांना तोंडावर मास्क बांधण्याचेही आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले. मास्क-९५ दर्जाचे नसले तरी कापडी मास्क आवर्जून वापरण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींकडून झाले. याच धर्तीवर सोलापुरातील अतुल स्पोर्ट्स गारमेंट कडून कापडी मास्क, हॅन्ड ग्लोज तसेच कापडी पीपीई किट तयार होत आहेत. कोरोना रूग्णांच्या संपर्कात डॉक्टरांना डब्ल्यूएचओ मानांकित कीट वापरणे बंधनकारक आहे. तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कापडी मास्क वापरल्यास काही अडथळा येणार नाही. बेसिक सुरक्षा म्हणून कापडी मास्क, कापडी हॅन्ड ग्लोज, कापडी पीपीई किट वापरणे उपयुक्त राहील असेही आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.-----------------------------ग्रामीण भागातील डॉक्टरांनाही उपयुक्त
पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीने पंधराशे कापडी पीपीई किटची ऑर्डर दिली आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याकरिता वाहनचालकांना सदर पीपीई किट वापरायला देणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील डॉक्टरांनाही सदर कापडी किट उपयुक्त राहणार आहे. मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारी, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्यासाठी ही कीट उपयुक्त आहे. सोलापुरातील डॉक्टरांना कापडी कीट दाखवले असून त्यांनी त्याचे कौतुक केले आहे, असे लोंढे -पाटील यांनी सांगितले आहे.