सोलापूर - मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील मोहोळ-मालिकपेठ, अनगर-वाकाव या ठिकाणचे ब्रिटीशकालीन पुल काढून नव्या पुलाची उभारणी केली. या दोन टप्प्यातील नव्या पुलावर गर्डर बसविण्याचे काम बुधवारी दुपारी पार पडले. चार तास चाललेल्या या कामामुळे या विभागातून मुंबई, पुण्याच्या दिशेने धावणार्या रेल्वे गाड्यांचा वेग भविष्यात निश्चितच वाढेल असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला.
सोलापूर-मुंबई रेल्वे मार्गावरील सोलापूर विभागात दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामानंतर आता इंजिनिअरींग विभागाकडील इतर प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. ब्रिटीशकालीन पुल काढून नव्या पुलाची उभारणी केलेल्या सर्वच पुलांवर गर्डर बसविण्याचे काम हाती घेतले आहे. बुधवारी सोलापूर रेल्वे विभागाच्या इंजिनिअरींग विभागाने मोहोळ-मालिकपेठ, अनगर-वाकाव या दोन ठिकाणी पुलावर गर्डर बसविण्याचे काम यशस्वी केले. आगामी काळात गाड्यांचा वेग वाढणार आहे, त्यामुळे रेल्वे विभागाकडून जुने पुल हटविण्याचे काम सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
------------
चार तासाचा घेतला होता ब्लॉक
मोहोळ-मलिकपेठ, अनगर-वाकाव या विभागातील कामामुळे सोलापूर रेल्वे प्रशासनाने बुधवारी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असा चार तासाचा ब्लॉक घेतला होता. या चार तासाच्या काळातील रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल झाल्याचे सांगण्यात आले. शिवाय काही गाड्यांसाठी इंजिनिअरींग विभागाने मार्ग खुला केला होता.
---------------
यातायात विभाग होता सतर्क...
या कामासाठी सोलापूर विभागाच्या इंजिनिअरींग विभागाचे ६० ते ७० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या कामासाठी दोन मोठे क्रेन, जेसीबी व अन्य यंत्र तैनात करण्यात आली होती. सात बाॅक्स व सात आरसीसी ब्लॉक पुलावर बसविण्यात आले. शिवाय यातायात विभागाचे निरीक्षक संजीव अर्धापुरे, इंजिनिअरींग विभागाचे रविकुमार यांच्या नियंत्रणाखाली विशेष पथक कार्यरत हाेते. चार तासाच्या कामे यशस्वी करण्यात यातायात विभाग व इंजिनिअरींग विभागाने मोठे परिश्रम घेतले.
मोहोळ-मलिकपेठ व अनगर-वाकाव या दोन टप्प्यात जुने पुल काढून नव्या पुलावर गर्डर बसविण्याचे काम पूर्ण केले. यासाठी चार तासाचा ब्लॉक घेतला होता, इंजिनिअरींग विभाग व यातायात विभागाच्या अधिकारी, कर्मचारी व संपूर्ण टीमने यशस्वी काम करून मोहिम फत्ते केली.
- संजीव अर्धापुरे,
यातायात निरीक्षक, मध्य रेल्वे, सोलापूर मंडल.