सोलापूर : रेल्वे मंत्रालयाने व्होकल फॉर लोकल या योजनेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. देश-परदेश व अन्य राज्यातून आलेल्या प्रवाशांना सोलापूरच्या विशेष उत्पादनांची माहिती व्हावी, त्यातून स्थानिक उत्पादनांची जास्तीत जास्त प्रमाणात विक्री व्हावी या उद्देशाने आता सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या स्टॉल्समधून प्रवाशांना चादर, टॉवेल अन् बेडशीटची खरेदी करता येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकाराने सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर "एक स्टेशन एक उत्पादन" योजना सुरू करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या २०२२ मधील अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या ‘वन स्टेशन, वन प्रॉडक्ट’ या घोषणेनुसार सोलापूर रेल्वे स्टेशन “एक स्टेशन, एक उत्पादन” संकल्पना राबविण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन मार्केटिंग चॅनल म्हणून काम करून स्टॉल वाटप करणार आहे. स्थानिक उत्पादनांच्या विशिष्ट क्षेत्रासाठी वेगळी व स्वतंत्र विक्री व्यवस्था करणार आहे.
-------
रेल्वे प्रवाशांना करणार आकर्षित...
सोलापूर रेल्वे स्थानक हे सोलापुरी चादर, सोलापुरी बेडशीट, सोलापुरी टॉवेल इत्यादींसाठी विक्री व प्रसिद्धी केंद्र म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे या व्यवसायात गुंतलेल्या उद्योगांसाठी अधिक कार्यक्षम लॉजिस्टिक विकसित करण्यात मदत करणार असून ग्राहकांना, म्हणजे स्थानकांमधून जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना अनोखी प्रादेशिक वस्तूविषयी आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे.
---------
स्टॉल्स हवा असल्यास हे करा..
ही योजना ८ एप्रिल २०२२ पासून एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. कारागिरांची ओळख स्थानिक स्वयंसहायता गट आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे करून देण्यात येईल. ज्या सहकारी संस्था निर्धारित उत्पादनांची विक्री व जाहिरात करून इच्छित आहेत. त्यांनाही त्यात सहभागी होता येईल. ज्यामध्ये दोन अर्जदारांना १५-१५ दिवसांसाठी या योजनेचा लाभ घेण्याची संधी देण्यात येणार आहे. इच्छुकांनी ५ एप्रिलपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
------
स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय सोलापूरची बाजारपेठ वाढविण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सोलापूरच्या उत्पादनाचे आता रेल्वे मार्केटिंग करेल.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल व्यवस्थापक, सोलापूर मंडल.