सोलापूर : कोरोना संसर्गाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याने ऑक्सिजनचे २३७ बेड सध्या रिक्त आहेत, तर १,८७९ बेड वर कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्येत घट होत असल्याने परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मागील दीड ते दोन महिन्यासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेड मिळविताना अडचणी येत होत्या. रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाइकांचीही होरपळ होत होती. बेडचा शोध घेईपर्यंत रुग्णांच्या प्रकृतीत आणखी बिघाड होत होते. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात चौकशी सुरूच होती. अनेक नातेवाईक तर रुग्णवाहिकेसोबत रुग्णांना घेऊन रुग्णालये फिरत होते. मागील काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रुग्णालयावरील उपचाराचा ताण बराच कमी होत आहे.
शहरामध्ये ५९ रुग्णालयांतून कोरोनावरील उपचार केले जात आहेत. जनरल बेडची संख्या ९३१ असून, ५१६ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ४१५ जनरल बेड रिक्त आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये बेडची संख्या कमी असल्याने विमा हॉस्पिटल व काडादी मंगल कार्यालयात उपचार सुरू करण्यात आले. त्याचाही फायदा होताना दिसत आहे.
आयसीयू, वेंटिलेटर बेडची गरज
शहारतील रुग्णसंख्या कमी होत असली तरी आयसीयु व वेंटिलेटर बेड अद्यापही पुरेसे नाहीत. आयससीयू बेडवर ४२६ रुग्ण उपचार घेत असून, सध्या आयसीयू बेड रिक्त नाही, तर व्हेटिंलेटरवर १५१ रुग्ण उपचार घेत असून, असे बेडही शिल्लक नाहीत. त्यामुळे अजूनही आयसीयू, व्हेंटिलेटर बेडचा शोध सुरूच आहे.
- शहरातील कोविड बेडची संख्या - २४३३
- पॉझिटिव्ह कोविड रुग्ण - १५५०
- संशयित कोविड रुग्ण - ३२९
- बेडवर उपचार सुरू - १८७९
- रिक्त बेड - ५५४