राजकुमार सारोळे
सोलापूर : कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणामुळे बोअर झालेल्या शाळकरी मुलांना विज्ञान व गणित विषयांची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वाध्याय अभ्यासमालेत ४ लाख ९० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून सोलापूर जिल्हा राज्यात नंबर एकवर आला आहे.
शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वाध्याय अभ्यासमालेचा २० वा आठवडा आहे. गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता. चालू आठवड्यात ४ लाख ९० हजार ४९३ विद्यार्थी सहभागी झाल्याने सोलापूर जिल्हा अव्वल आला आहे. स्वाध्याय अभ्यासमालेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी तालुकास्तरावर मुख्याध्यापकांच्या स्पर्धा लावल्या. दररोज शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधल्यामुळे सुरुवातीला २७ व्या क्रमांकावर असलेला सोलापूर जिल्हा आज टॉपवर आला, अशी माहिती शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी वेळाेवेळी बैठका घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यामुळे जे तालुके मागे होते, तेथील विद्यार्थी सहभागसंख्या वाढत गेली. त्याचबरोबर खासगी शाळांशी पत्रव्यवहार केला. यामुळे विद्यार्थी जोडले गेले. पटसंख्येच्या सहभागात सातारा, बुलडाणा, सोलापूर, उस्मानाबाद, वाशिम या जिल्ह्यांचा सहभाग राहिला.
काय आहे ‘स्वाध्याय’
कोरोना महामारीमुळे शाळा सुरूच झाल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. सतत मोबाइलसमोर थांबून विद्यार्थी कंटाळा करू लागले. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन अभ्यासमाला सुरू केली. शाळांचा युडायस नंबर टाकून विद्यार्थी यात सहभागी होऊ लागले. दर आठवड्याला विज्ञान, गणित व भाषा विषयांचे १० प्रश्न विचारले जातात. पर्याय निवडून उत्तरे दिल्यानंतर लगेच किती प्रश्नांचे उत्तर बरोबर आले, याचा निकाल येतो. यातील प्रश्न विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारे तज्ज्ञांमार्फत निवडले जातात.
स्वाध्याय अभ्यासमालिकेत सोलापूर जिल्हा राज्यात टॉपवर आला, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे विद्यार्थी सहभागी झाले, त्यांनी यातील मजेदार प्रश्न इतरांना सांगितले, त्यामुळे स्पर्धा वाढली.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर
या आठवड्यातील टॉप जिल्हे
- सोलापूर : ४,९०,४९३
- सातारा : ३,८३,४६२
- बुलडाणा : ३,२४,८७९
- विभागनिहाय टॉपर्स
- पुणे विभाग - सोलापूर : ४,९०,४९३
- नाशिक विभाग - जळगाव
- २,९५,८१०
- नागपूर विभाग - चंद्रपूर
- १,००,८६२
- अमरावती विभाग - बुलडाणा
- ३,२४,८७९
- औरंगाबाद विभाग - जालना
- १,७०,७०८
- कोकण विभाग - ठाणे
- १,५२,६१०.