सोलापूर: मागील पंधरवड्यात जिल्ह्याचा २६ टक्के असलेला पॉझिटिव्हचा दर आता १२.१९ टक्क्यांवर आला आहे. कोरोना पॉझिटिव्हचा आलेख फेब्रुवारीनंतर वाढत गेला असला तरी तो मेच्या शेवटच्या आठवड्यात खाली येत आहे. मात्र, मे महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे १ हजार १२७ बळी गेले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट मार्चनंतर जिल्ह्यात वाढत गेल्याचे दिसून येत आहे. एप्रिल व २१ मेपर्यंत ही वाढ कायम राहिली. मात्र, त्यानंतर शहर व ग्रामीण भागातही संसर्ग कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. १३ मे रोजी जिल्ह्याचा पॉझिटिव्हचा दर २०.५३ होता, तो पुन्हा १६ मे रोजी २६.५४ टक्क्यांवर गेला. त्यानंतर मात्र पॉझिटिव्हचा दर कमी कमी होत असल्याचे आशादायी चित्र दिसत आहे. जानेवारी महिन्यात ७२ हजार १०७ चाचण्यांत २ हजार ५४१ रुग्ण आढळले. केवळ ६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ४९ हजार ७४६ चाचण्यांत २ हजार २३ रुग्ण आढळले व ४२ जणांचा मृत्यू झाला. इथपर्यंत कोरोनाचा संसर्ग कमी होता. पण, मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग भर्रकन वाढला. १ लाख १९ हजार ३६८ चाचण्यांत ८ हजार ७६१ रुग्ण पॉझिटिव्ह तर ११३ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात २ लाख ८५ हजार २०३ चाचण्यांत ३६ हजार २३६ जण पॉझिटिव्ह आढळले तर ७४० जणांचा मृत्यू झाला. २७ मे अखेर जिल्ह्यात २ लाख ६८ हजार ९३२ चाचण्या झाल्या. त्यात ४७ हजार ९२९ पॉझिटिव्ह तर १ हजार १२७ जणांचा मृत्यू झाला. मे महिन्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह व मृत्यू झाले असले तरी आता हळूहळू संसर्ग कमी होत असल्याचे चित्र आहे.
२१ ते २७ मे या सात दिवसांचा विचार केल्यास सोलापूर शहरात २६ जणांचा तर ग्रामीणमध्ये १८० जणांचा मृत्यू झाला. शहराचा मृत्यूदर ८.४ तर ग्रामीणचा २.३ टक्के आहे. गेल्या पंधरवड्याचा विचार करता २४ मे रोजी ६ हजार ८१० व २७ मे रोजी ७ हजार ७१४ अशा दोन दिवसांत चाचण्या कमी झाल्या आहेत; अन्यथा दररोज १० ते ११ हजार चाचण्या होत आहेत. शहरात पॉझिटिव्ह येण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे, तर ग्रामीणमध्ये हे प्रमाण गेल्या चार दिवसांपासून कमी होत आहे.