सोलापूर : शहरातील व्यापार सुसह्य व्हावा, शहरात मल्टिनॅशनल कंपन्यांचे शोरूम्स, मॉल यावेत यासाठी महापालिकेचा सुपर टॅक्स जवळजवळ रद्द करण्याचा प्रस्ताव मनपाच्या कर संकलन विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मनपा आयुक्त दीपक तावरे यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर मंजुरीसाठी तो सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली.
सोलापूर महापालिकेचा सुपर टॅक्स पुण्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे येथे मल्टिनॅशनल कंपन्या येत नाहीत, असा निष्कर्ष सर्वपक्षीय नेत्यांनी काढला आहे. या कराची पुनर्रचना व्हावी, अशी मागणी महापालिकेच्या पदाधिकाºयांनी केली होती. त्यावर चर्चा करण्यासाठी २९ आॅक्टोबर रोजी महापालिकेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी सुपर टॅक्स कमी करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतर कर संकलन विभागाने सुपर टॅक्स कमी करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबादसह इतर महापालिकांच्या कर आकारणीचा अभ्यास केला. यातील निष्कर्षानुसार सुपर टॅक्स जवळपास रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. शिवाय आता मिळकतदार व भाडेकरू यांच्यातील झालेल्या भाडेपट्टा करारानुसार महापलिकेचा कर मिळकतदार किंवा भाडेकरू यापैकी कोणीही भरणार असतील तर त्यांच्या बाबतीत भाडे किंवा करपात्र मूल्य एकच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडेल, असा निष्कर्ष कर संकलन प्रमुखांनी काढला आहे.
काय आहे सुपर टॅक्स - शहरातील अनेक मालमत्ताधारकांनी मल्टिनॅशनल कंपन्यांना आपल्या जागा भाड्याने दिल्या आहेत. या भाड्यावर महापालिकेकडून सुपर टॅक्स आकारला जातो. अनेक भागात भाडे आकारणीवर सुमारे ६४ टक्क्यांपर्यंत सुपर टॅक्स आकारला जातो. यातून पळवाट काढण्यासाठी अनेक व्यापारी मूळ भाडेकरारासह कमी भाडे आकारणीचा दुसरा करार करून घेतात. शहरात जवळपास असे १९ हजार भाडेकरार निदर्शनास आले आहेत़ यातील केवळ ५११ जण सुपर टॅक्स भरत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
आचारसंहितेत अडकणार - सुपर टॅक्स रद्द करण्याबाबतच्या प्रस्तावाची १ एप्रिल २०१९ पासून अंमलबजावणी व्हावी, असे कर संकलन विभागाने म्हटले आहे. हा प्रस्ताव पुढील आठवड्यात प्रशासनाकडून मंजूर होईल, पण त्यानंतर तो तत्काळ सर्वसाधारण सभेत येईल की नाही, याबद्दल शंका आहे. पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत.