सोलापूर : महाराष्ट्रात येत्या सोमवारपासून म्हणजेच ७ जूनपासून पाचस्तरीय अनलॉक करण्यात येणार आहे, अशी घोषणा गुरूवारी मध्यरात्रीनंतर करण्यात आली. या संदर्भात काढण्यात आलेल्या शासकीय परिपत्रकात म्हटले आहे की, अनलॉक करण्यासाठी जे पाच टप्पे ठरविण्यात आले आहेत, त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आपला जिल्हा कोणत्या स्तरात बसतो, हे पाहून आदेश काढावेत असे नमूद केले आहे त्यानुसार सोलापूर ग्रामीण मध्ये सोमवारपासून आणला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शासनाने जाहीर केलेले सुधारित नियम सोमवारपासूनच लागू होतील. कोरोना पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजनच्या बेडवरील रुग्णसंख्या यानुसार, हे स्तर ठरविण्यात आले आहेत.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक संदर्भात घोषणा केली होती पण त्यानंतर काहीच तासात राज्य शासनाने खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे सरकारी गोंधळ समोर आला होता. मात्र, अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली.
तीन जून रोजी शासनाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यात ३१,२२४ ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. हा रुग्णसंख्या आढळण्याचा घसरण्याचा दर समजला जात आहे. याचा तपशील शासनाकडे आहे. या आकडेवारीनुसार संबंधित जिल्हा कुठल्या स्तरात बसतो, ते प्रशासन ठरवू शकतात. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, वसई-विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर व कल्याण हे विशेष प्रशासनिक युनिट समजले जाणार आहेत. उर्वरित ३४ जिल्हे एकल प्रशासनिक युनिट समजले जाणार आहेत.
पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पहिल्या टप्प्यात येईल. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग दुसऱ्या स्तरात गणला जाईल. पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण असतील तर तो भाग तिसऱ्या स्तरात गणला जाईल. पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण असतील तर असा भाग चौथ्या स्तरात गणला जाईल. पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक आणि ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण असतील तर तो भाग पाचव्या स्तरात असेल.
दुकाने, संस्था यांच्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या स्तरातील भागात नियमितपणे व्यवहार करता येतील. तिसऱ्या आणि चौथ्या स्तरातील भागात दुपारी ४ पर्यंत व्यवहार सुरु असतील. पाचव्या स्तरात दुपारी ४ पर्यंत व्यवहार सुरु राहतील आणि विकेंडला औषधांशिवाय इतर बाजारपेठ बंद राहील. मॉल, थिएटर हे पहिल्या स्तरात पूर्ण क्षमतेने सुरु राहील. दुसऱ्या स्तरात ५० टक्के क्षमतेने सुरु राहील. तर, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्तरात पूर्णपणे बंद राहील. रेस्टॉरंट पहिल्या स्तरात सुरु राहतील. दुसऱ्या स्तरात ५० टक्के क्षमतेने तर तिसऱ्या स्तरात ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ पर्यंत सुरु राहतील. चौथ्या स्तरात पार्सल आणि होम डिलिव्हरी देता येईल. पाचव्या स्तरात केवळ होम डिलिव्हरी असेल.