सोलापूर : आरटीई प्रवेशासाठी २३ जुलैपर्यंतची दिलेली मुदत प्रशासनाकडून तिसऱ्यांदा वाढवत ही मुदत ३१ जुलैपर्यंत करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा शिक्षण विभागाकडून शुक्रवारी सायंकाळी पत्रकाद्वारे करण्यात आली.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. यात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण राज्यभरात अनेक ठिकाणी गटशिक्षण अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून निवड केलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश निश्चित न झाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ३१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना आरटीईमधून प्रवेश घेता येणार आहे. सोबतच गटशिक्षण अधिकारी यांना विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने निश्चित करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातून पहिल्या सोडतमधून १७३८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी १६३१ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत देण्यात आलेली आहे. यामधील १०७८ विद्यार्थ्यांचे गुरुवारपर्यंत तात्पुरते प्रवेश झाले होते. यातील १०१७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.