सोलापूर : अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अशा रुग्णांची सेवा करणाऱ्यांनी ऑनलाइन माहिती भरल्यानंतर डॉक्टर घरी जाऊन लसीकरण करतील, असे हे नियोजन आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली.
दरम्यान, १ ते १७ वयोगटातील मुले वगळता इतर सर्वांना लसीकरण सुरू झाले आहे. आरोग्य, फ्रंटलाइन कर्मचारी, १८ ते ४४, ४५ वर्षांवरील कोमार्बिड व ६० वर्षांपुढील ज्येष्ठ व्यक्ती, अशा गटांसाठी टप्प्याने लसीकरण सुरू झाले. सोलापूर जिल्ह्यात या वयोगटातील ३५ लाख ७८ हजार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांमध्ये आणखी वेगवेगळ्या स्थितीचे लाभार्थी आहेत. सध्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी मोठ्या प्रमाणावर लसीकरणापासून वंचित आहेत. याचबरोबर सर्व वयोगटात दिव्यांग व अंथरुणाला खिळून असलेले, बेघर, अति जोखमीच्या आजार असलेल्या व्यक्ती आहेत. अशांसाठी वेगळी मोहीम घेण्यात येत आहे. अद्याप घरी जाऊन लस देण्यास शासनाने परवानगी दिली नाही; पण हायरिस्कमधील लोकांना लस देण्यासाठी वेगळी मोहीम घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे मोबाइल व्हॅनमधूॅन लसीकरण करण्याचा प्रयोग हाती घेण्यात आला आहे.
...असा आहे प्रस्ताव
वृद्धत्व, अपंगत्व, पॅरॅलिसिस, अपघात व इतर आजारांमुळे अनेक जण अंथरुणाला खिळून आहेत. अशा रुग्णांना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणे शक्य होत नाही. अशा व्यक्तींसाठी काळजी घेणाऱ्या व्यक्तींकडून लसीकरण करण्यासाठी मदत घेता येणार आहे. लवकरच अशा व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे. ही माहिती ऑनलाइन भरल्यानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी घरी जाऊन अशा रुग्णांना सेवा देणार आहेत. मुंबई महापालिकेने असा प्रयोग सुरू केला आहे. शासनाने परवानगी दिल्यावर टास्क फोर्स समितीच्या मंजुरीने सोलापुरातही हा प्रयोग करण्याचा प्रस्ताव असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.
दिव्यांगांसाठी खास मोहीम
जिल्ह्यात २९ हजार ९२ व्यक्ती दिव्यांग आहेत. या सर्वांना लस मिळावी म्हणून समाजकल्याण विभागातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आरोग्य केंद्रावर आल्यावर प्राधान्यक्रमाने दिव्यांगांना लस देण्यात येत आहे. सायकल, स्कूटर, रिक्षा, कारमधून आलेल्या दिव्यांगांना आहे त्याच ठिकाणी डोस देण्यात आला आहे. सुमारे साडेतीन हजार जणांनी याचा लाभ घेतला आहे.
हायरिस्क व्यक्तींसाठी सत्र
सोलापूर, बार्शी व पंढरपूर या तीन तालुक्यांत सेक्सवर्करसाठी मोहीम हाती घेण्यात आली. मोबाइल व्हॅन व विशेष सत्रातून १,१०० जणींना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली. त्याचबरोबर एचआयव्हीबाधितांची संख्या १२ हजारांवर आहे. यातील ९०० जणांनी शासकीय रुग्णालयाच्या सेंटरवर लस घेतली आहे. याचबरोबर हायरिस्कमधील ६०० जणांना लस देण्यात आली आहे.