सोलापूर : कोरोना महामारीमुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात नोकरी गेलेल्या बेरोजगारांना आता कर्मचारी राज्य बिमा निगम अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अटल बिमा कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता दिला जाणार आहे. पूर्वी बेरोजगारांना दिला जात असलेला भत्ताच या कामगारांना मिळणार आहे, त्यात दुप्पट वाढ केल्याची माहिती कर्मचारी राज्य बिमा निगम, दमाणी नगरचे शाखा प्रबंधक शशिशेखर शिराळे व सहायक सुदर्शन पापरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
कोरोना महामारीमुळे देशभर लॉकडाऊन पुकारण्यात आला होता़ त्याकाळात बाजारपेठा, उद्योगधंदे, खासगी कंपन्या, कारखाने आदी बंद ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते़ तब्बल पाच महिने लॉकडाऊन ठेवण्यात आला होता, त्यामुळे आर्थिक स्थिती ढासळली. उत्पादन कमी, पुरवठा कमी झाल्याने अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापनाने कामगारांना कामावरून काढून टाकले़ त्यामुळे कोरोनाकाळात बेरोजगारांची संख्या दुप्पट झाली़ या बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी शासनाने अटल बिमा कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता देण्याचे जाहीर केले़ हा बेरोजगार भत्ता आता दुप्पट मिळणार आहे.
------असा मिळेल भत्ता...दोन वर्षे नोकरी करून २४ मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान बेरोजगार झालेल्या ईएसआयसीमधील नोंदणीकृत कामगारांना हा बेरोजगार भत्ता देण्यात येणार आहे़ यासाठी कामगारांनी www.esic.in या पोर्टलवर लॉगइन करून आॅनलाईन फॉर्म भरावयाचा आहे़ त्यानंतर त्या फॉर्मची प्रत, आधारकार्ड, बँक पासबुक, चेकच्या प्रतिसह कर्मचारी राज्य बिमा निगम, दमाणी नगर शाखेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाकाळात नोकरी गेलेल्यांना ईएसआयसीच्या अटल बिमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता देण्यात येत आहे. पूर्वी मिळणारा सरासरी पगाराच्या २५ टक्के भत्ता आता ५० टक्के करण्यात आला आहे़ हा भत्ता जास्तीत जास्त ९० दिवसांचा असणार आहे व तो नोकरीवरून काढून टाकल्यानंतर ३० दिवसांनी मिळणार आहे़ तरी जास्तीत जास्त बेरोजगारांनी या भत्त्याचा लाभ घ्यावा.- सुदर्शन पापरकर, कर्मचारी राज्य बिमा निगम, दमाणी नगर, सोलापूर