आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्याला जोडणारा मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-बार्शी या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित बार्शी ते उस्मानाबाद-लातूर रोडर्यंतचे काम मार्चअखेर पूर्ण होणार आहे. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या ताशी ८० ते १०० किमी प्रतितास वेगाने धावल्यास मिरजहून लातूरला पोहोचण्यात अवघे तीन ते साडेतीन तास लागणार आहेत.
मागील काही वर्षांपासून मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दौंड ते वाडीपर्यंत दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. रेल्वे विभागाने ४ ऑक्टोबर २०१८ रोजी मिरज-पंढरपूर- कुर्डुवाडी- बार्शी- उस्मानाबाद-लातूर या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण कामास सुरुवात केली. ३४२ किमीचे हे काम पूर्ण करण्यासाठी ३५२ कोटी ५८ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. या मार्गावर मिरज-लातूर, बीदर-कोल्हापूर, मिरज-परळी पॅसेजर, निझामाबाद-पंढरपूर पॅसेजर या गाड्या धावतात. गर्दी व प्रवाशांच्या मागणीचा विचार करता भविष्यात या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
मिरज-पंढरपूरची विद्युत चाचणी यशस्वीमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मिरज-पंढरपूर या १३२ किलोमीटर रेल्वेमार्गावर विद्युत चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. डिझेल इंजीनने मिरज-पंढरपूर प्रवासासाठी दोन तास लागतात मात्र विजेवर चालणारी रेल्वे गाडी सव्वातासात पंढरपूरला पोहोचली.
तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणारमध्य रेल्वेच्या पुणे विभागात मिरज-कोल्हापूर या ४८ किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. सोलापूर विभागात मिरज-कुर्डुवाडी रेल्वेमार्गावर पंढरपूरपर्यंत एकेरीमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. नुकत्याच झालेल्या या विद्युत चाचणीमुळे कोल्हापूर-मिरज-पंढरपूर या मार्गावर विजेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्या नियमित सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे पंढरपूर या तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सध्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दौंड ते वाडीपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-बार्शीपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बार्शी ते उस्मानाबाद-लातूर रोडर्यंतचे काम मार्चअखेर पूर्ण होणार आहे. या कामामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. - शैलेश गुप्ता, विभागीय व्यवस्थापक, सोलापूर मंडल, मध्य रेल्वे.