साेलापूर : शहरातील पेट्राेलपंप सायंकाळी ४ वाजेनंतर खुले ठेवण्यास साेमवारपासून परवानगी देण्यात येईल. मात्र या पंपांवर सायंकाळी ४ नंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पेट्राेल-डिझेल देणे बंधनकारक असेल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी सांगितले.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. शहरातील पेट्राेलपंप सायंकाळी ४ वाजेनंतर बंद असतात. केवळ पाेलीस दलाचे दाेन पंप सुरू असतात. या पंपावर माेठी गर्दी असते. सायंकाळी ४ वाजल्यानंतर इतर पेट्राेलपंप सुरू करण्यास परवानगी द्या, अशी मागणी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली हाेती. यावेळी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संताेष पवार, नगरसेवक गणेश पुजारी, प्रमोद दरगड, इंद्रमल जैन, जयचंद वेद, हर्षल कोठारी, अनिल जैन, धर्मेश राडिया, अनिल वेद, अशोक चव्हाण, केतन व्होरा, मनीष पंचारिया आदी उपस्थित हाेते. पालकमंत्री भरणे यांनी पेट्राेलपंप सुरू करण्यास परवानगी देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
महापालिकेने शुक्रवारी सायंकाळपर्यंत याबद्दलचा आदेश काढला नव्हता. याबद्दल आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, शहरात सायंकाळी ४ नंतर संचारबंदीचे आदेश आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी फिरू नये असे शासनाने निर्देश आहेत. पेट्राेलपंपांवर केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना पेट्राेल मिळणे अपेक्षित आहे. मात्र पंपांवर इतर लाेकही पेट्राेल भरू लागल्याने निर्बंध आले आहेत. रविवारी नवा आदेश जारी करताना पेट्राेलपंपाबाबतही आदेश दिले जातील. परंतु, काेणाला पेट्राेल द्यायचे याचे निर्बंध कायम राहतील.