आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर आणि परिसरातील तालुक्यांमध्ये काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. आज सकाळपासून सूर्यदर्शन नाही. पावसाळी हवामान असून भिज पाऊस सुरू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने येत्या आठ दिवसात उजनी धरण प्लसमध्ये येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, आज सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासात सोलापुरात २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आणखी एक आनंदाची बाब म्हणजे उजनी धरणाकडे येणारा दौंड विसर्ग २६ हजार क्युसेक इतका झाला आहे. हाच वेग राहिला तर येत्या आठवडाभरामध्ये उजनी धरण वजावट संपून अधिक कडे जाईल. शिवाय पुणे जिल्ह्यातही मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्याने खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे, धरण परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील धरणाचे पाणी उजनीकडे येण्यास सुरूवात झाल्याने येत्या आठ दिवसात उजनी धरण प्लसमध्ये नक्की येईल अशी शक्यता धरण क्षेत्र कार्यालयातील अधिकारी यांनी सांगितले.