चपळगाव - अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरलेल्या कुरनूर धरणातुन मंगळवारी सकाळी पाणी सोडण्यात आले. यामुळे अक्कलकोट, मैंदर्गी,दुधनी नगरपालिकेसह नदीकाठच्या गावांचा भर उन्हाळ्यात पाणीप्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.
मागील आठवड्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी,संबधित विभागाचे अधिकारी आणि पंचक्रोशीतील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. यामध्ये धरणाच्या खाली असणार्या गावांचा पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. यानुसार संबधीत विभागाने मंगळवारी सकाळी पाणी सोडण्याची कार्यवाही केली. यात धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातुन ६०० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात केवळ ८५ टक्के पाणीसाठा आहे.धरणात सद्यस्थितीत ६९९ दशलक्ष धनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. प्रत्येक दरविजे एक ते दीड इंचने उघडले आहेत. सोडलेले पाणी खालच्या अक्कलकोट, सांगवी, ममदाबाद,निमगाव, सातनदुधनी, रूद्देवाडी, बबलाद, सिंदखेड या बंधाऱ्यात साठवले जाणार आहे.
ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीला प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न तुर्तास मिटला आहे. यामुळे रब्बी पिकांना फायदा होण्यास मदत होईल.बोरी मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा,शाखा अभियंता रोहित मनलोर,कालवा निरीक्षक प्रशांत लोंढे,माजी बिटधारक एन.व्ही.उदंडे,राहूल काळे,स्वामी रोट्टे यांनी पाणी सोडण्याची कार्यवाही केली.