सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णामुळे प्रतिबंधित करण्यात आलेले दक्षिण सोलापुरातील येळेगाव, वांगीवरील निर्बंध काढून टाकण्यात आलेले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली.
येळेगाव-गावडेवाडी रस्त्यावर पांगळेवस्तीवर बेदाणा शेडवर काम करणारा मध्यप्रदेशातील कामगार मार्चमध्ये गावी परतला होता. ७ एप्रिल रोजी त्रास होऊ लागल्याने त्याला ग्वाल्हेरच्या मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. चाचणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तो सोलापूर जिल्ह्यातून परतल्याचे तेथे सांगितल्यावर मध्यप्रदेश सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयास याची माहिती दिली होती. हा अहवाल मिळताच खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा भाग प्रतिबंधित करून तो जिथे काम करीत होता त्याच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन करून आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे जिल्हा आरोग्याची यंत्रणा कामाला लागली. बेदाणा शेडबाजूचा तीन किलोमीटर परिसर प्रतिबंधित करण्यात आला. यामध्ये येळेगाव, गावडेवाडी व वांगीचा भाग होता. पोलिसांनी या तिन्ही गावच्या सीमा सील करून १४ दिवस बाहेरच्यांना प्रवेशबंदी केली होती.
अशी झाली तपासणी- प्रतिबंधित क्षेत्रात ३ हजार ५९ इतकी लोकसंख्या होती. १४ दिवसात प्रतिबंध क्षेत्राच्या बाहेर ७ किलोमीटर परिसरातील बफर क्षेत्रातील ८ गावच्या ४२ हजार ८२६ लोकांची १७ पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये त्या कामगाराच्या संपर्कातील अति जोखमीच्या ११४ जणांना संस्थात्मक तर ४१३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.
अंतिम अहवालानंतर निर्णय- एप्रिल रोजी वांगी, गावडेवाडी आणि येळेगाव हा परिसर सील करण्यात आला. १४ दिवस पूर्ण होत आल्यावर २२ एप्रिल रोजी जिल्हा सर्वेक्षण अधिकाºयांनी अंतिम अहवाल सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने हा भाग प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. जमादार यांनी सांगितले.
सारीचे झाले सर्वेक्षण- प्रतिबंधित क्षेत्राचे सर्वेक्षण करताना ७४ व बफर झोनमध्ये २३४ जण किरकोळ आजारी आढळले. त्यामुळे यातील रुग्णांच्या लक्षणावरून ३ जणांची सारी तर एक जणाची कोविडची टेस्ट घेण्यात आली. पण टेस्ट निगेटिव्ह आली तर दोघांवर उपचार करण्यात आले.