सोलापूर : लहानपणापासून संगणकाची आवड आणि कमालीची जिज्ञासू, चिकित्सक वृत्ती असलेल्या ओंकार जंजीराल या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला ‘गुगल’ने आंतरराष्टÑीय ब्लॉगर म्हणून गौरविले असून, येत्या १५ आॅगस्ट रोजी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्या हस्ते त्याचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. यासाठी तो सोमवारी अमेरिकेला रवाना झाला आहे.
ओंकार सध्या विडी घरकूल परिसरातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संचलित गंगुबाई केकडे कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहे. बारावीला (विज्ञान शाखा) असलेल्या ओंकारला लहानपणापासून संगणकाची आवड होती.
दहावीपर्यंतचे त्याचे शिक्षण इंडियन मॉडेल स्कूलमध्ये झाले. पाचवीत असताना त्याने संकेतस्थळ (वेबसाईट) बनविली. यानंतर संगणकाबद्दलची त्याची आवड वाढतच गेली. दहावीनंतर त्याची संगणक, इंटरनेटशी अधिकच दोस्ती झाली. ‘भारतीय मसाले’ या नावाने त्याने ब्लॉग तयार केला.
एक विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असताना अत्यंत अभ्यासूपणे संपूर्ण जगाला देशभराची माहिती देतो, ही बाब ‘गुगल’ने हेरली. अशा प्रकारे माहिती ब्लॉगद्वारे सर्वत्र पोहोचविणाºया विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुगलने भारतातील ३० विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा स्वखर्चाने अमेरिकेत बोलावून गौरव करण्याचे ठरविले.
महाराष्टÑातून अशा तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये सोलापूरच्या ओंकारचा समावेश आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ आॅगस्ट रोजी त्याचा अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅलीमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या हस्ते आंतरराष्टÑीय ब्लॉगर म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव होणार आहे.
आई-वडिलांचे अपघाती निधनवयाच्या १७ व्या वर्षी आंतरराष्टÑीय पातळीवर पोहोचणाºया ओंकारच्या आई-वडिलांचे तो लहान असताना अपघाती निधन झाले. ओंकारचे पालनपोषण त्याच्या आजी-आजोबांनी केले. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाशिवाय त्याने मिळविलेले यश हे अधोरेखित करण्यासारखे आहे. यानिमित्त सोमवारी संभाजीराव शिंदे प्रशालेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.