सोलापूर -भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन धनगर समाज आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी मागणी धनगर समाज आरक्षण आंदोलन कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
बंगाळे म्हणाले, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा डाव आखला आहे. सरकारने कंत्राटी भरती रद्द करावी. धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी आमच्या कृती समितीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा टाकला. यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लबाड काकाच्या नादाला लागू नये, भंडाऱ्याचा वापर आंदोलनासाठी करू नये अशी मागणी केली.
वास्तविक भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली धनगर आरक्षणाचा शब्द दिला होता. अजूनही त्यांनी शब्द पाळलेला नाही. त्यामुळे कोण लबाड आहे हे लोकांना कळून चुकले आहे. पडळकर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे अशी मागणी आम्ही करत आहोत. सोमवारपासून जिल्हाभर आंदोलने सुरू होतील असेही बंगाळे यांनी सांगितले.