जिल्हा परिषदेत नोकरी करणाऱ्या गुरुजींची टेस्ट पॉझिटिव्ह येताच मित्रमंडळी, नातेवाईकांनी बेड मिळवण्यासाठी धडपड केली. अखेर काही तासांच्या प्रतीक्षेनंतर बेड उपलब्ध झाला. गुरुजींवर उपचार सुरु होते. यावेळी खालावलेली ऑक्सिजनची पातळी वाढत नसल्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासत होती. यासाठी नातेवाईक व मित्रमंडळींना या औषधाची उपलब्धता नसल्यामुळे प्रतीक्षा करावी लागत होती. खूप प्रयत्न केले. अखेर इंजेक्शन न मिळाल्यामुळे गुरुजींची प्राणज्योत मालवली.
भविष्यातील प्राण वाचावेत
गुरुजींच्या कार्याचा शिक्षण विभागात लौकिक होता. त्यांनी ३१ मार्च रोजी लस घेतली होती. ५ मे रोजी गुरुजी ४५ वर्ष वयाचा टप्पा पूर्ण करणार होते. यापूर्वीच गुरुजींना कोरोनाने गाठले. योग्यवेळी बेड व इंजेक्शन उपलब्ध झाले असते तर गुरुजी वाचले असते. मात्र सरकार अशा मृत्यूबाबत गांभीर्याने घेणार का? तालुक्यात उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांची ही परिस्थिती आहे. या परिस्थितीमुळे आणखी किती रुग्णांचे जीव जाणार? प्रशासन अशा मृत्यूंची जबाबदारी स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न सध्या अंतर्मुख करायला लावणारे आहेत.