- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ या उपक्रमाची दखल ‘गव्हर्नन्स नाऊ’ या संस्थेने घेतली आहे. या संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट सार्वजनिक सेवा आणि उपक्रम याकरिता देशपातळीवर देण्यात येणाऱ्या यंदाच्या पुरस्कारासाठी ‘ऑपरेशन परिवर्तन’ उपक्रमाची निवड करण्यात झाली असून, शुक्रवारी व्हर्च्युअल ऑनलाइन पद्धतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘गव्हर्नन्स नाऊ’ या संस्थेमार्फत गेल्या वर्षापासून पोलीस परिषद आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यंदाचे या परिषदेचे आणि पुरस्काराचे दुसरे वर्ष असून, शुक्रवारी, १५ जुलै रोजी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. भविष्यातील पोलीस प्रशासन, नावीन्यपूर्ण उपक्रम आदी मुद्द्यांवर परिषदेस उपस्थित विविध मान्यवरांकडून चर्चा व मार्गदर्शन होते. तसेच, देशपातळीवर पोलीस प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या नावीण्यपूर्ण उपक्रमाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातून हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘ऑपरेशन परिवर्तन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हातभट्टी दारू व्यावसायिकांवर केवळ कारवाई न करता समुपदेशनाद्वारे त्यांचे मनपरिवर्तन करणे व त्यांना इतर रोजगार – व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन करणे, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत अवैध हातभट्टी दारू व्यवसायात गुंतलेल्या ६०० हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात सोलापूर पोलिसांना यश आले आहे. काही महिलांनी एकत्र येत शिलाई मशीन व हस्तउद्योगाच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे, तर पोलीसांमार्फत राबविण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यातूनही रोजगार मिळवून देण्यात आला आहे. वारंवार कारवाई, समुपदेशन, पुनर्वसन आणि जागृती या चतु:सूत्रीवर आधारलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ या उपक्रमाची संसदेत, राज्य पातळीवर आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनाच्या पातळीवर कौतुक झाले आहे.