सोलापूर : लोकमंगल मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटी दूध भुकटी प्रकल्पात साडेबारा कोटींच्या अनुदानासाठी बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सुपुत्रासह नऊ संचालकांविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी रात्री सदर बझार पोलीस ठाण्यात प्रभारी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी पांडुरंग येडगे यांनी फिर्याद दाखल केली.
दरम्यान, लोकमंगल मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटीचे संचालक रोहन सुभाष देशमुख (रा. सह्याद्री नगर, होटगी रोड, सोलापूर), रामराजे राजेसाहेब पाटील (भोयरे, ता. बार्शी),अविनाश लक्ष्मण महागावकर (रा. विद्या नगर, पाथरुट चौक, सोलापूर), सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी (रा. मेनरोड अक्कलकोट), प्रकाश वैजिनाथ लातुरे (रा. आॅल इंड.स्टेट सिग्नल कॅम्प लातूर), बशीर बादशहा शेख (रा. मंगळवेढा), मुरारी सारंग शिंदे (रा. पाकणी, ता. उत्तर सोलापूर), हरिभाऊ धनाजी चौगुले (रा. अवंती नगर, सोलापूर), भीमाशंकर सिद्राम नरसगोंडे (रा. होनमुर्गी, ता. दक्षिण सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संचालकांची नावे आहेत.
बीबीदारफळ येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटीच्या संचालक मंडळाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनुदान तत्त्वावर दूध भुकटी प्रकल्पासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दरसूची पत्र, राज्य विद्युत महामंडळाचे प्रमाणपत्र, अन्न व औषध विभागाचे प्रमाणपत्र आणि कारखाना अधिनियम परवाना प्रमाणपत्र आदी कागदपत्रे बनावट तयार करून सादर केली. मंद्रुप येथील आप्पाराव गोपाळराव कोरे यांनी प्रस्तावासोबत जोडलेली कागदपत्रे खोटी आणि बनावट असल्याची तक्रार दुग्ध विकास विभागाकडे केली होती.
शासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आणि त्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, प्रस्तावासोबत जोडलेली कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रकरण उजेडात आले. यामध्ये शासनाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अवर सचिव राजेश गोवील यांनी याच विभागाच्या आयुक्तांना संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी रात्री सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे सुपुत्र रोहन देशमुख यांच्यासह लोकमंगल मल्टीस्टेटच्या नऊ संचालकांविरुद्ध प्रभारी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी पांडुरंग येडगे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सदर बझार पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा आहे दूध भुकटी प्रकल्पाचा प्रस्ताव... राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत बीबीदारफळच्या लोकमंगल मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटीने १0 मेट्रिक टन दूध भुकटी उत्पादनाचा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडे २४ जून २0१५ रोजी प्रस्ताव दाखल केला होता. त्याचबरोबर सध्याची ५0 हजार लिटर प्रतिदिन दूध संकलन क्षमता असलेल्या दुग्ध शाळेचे प्रतिदिन १ लाख लिटर क्षमते इतके विस्तारीकरण करण्याचा हा प्रस्ताव होता. त्यासाठी २४ कोटी ८१ लाख खर्च अपेक्षित होता.
यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५0 टक्के म्हणजे १२ कोटी ४0 लाख रुपये अनुदान मिळणार होते. त्यापैकी पहिला हप्ता दोन कोटी आणि दुसरा ३ कोटी असे एकूण ५ कोटी रुपये संस्थेचे कार्यकारी संचालक आणि जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्या बँक आॅफ महाराष्ट्र (शाखा फलटण गल्ली) मध्ये संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात आले. निविदा मागण्याची प्रक्रिया सुरू असतानाच संस्थेच्या विरोधात तक्रार दाखल झाली. त्यामुळे चौकशी सुरू झाली, त्यात तथ्य आढळल्याने अनुदानाची रक्कम थांबवण्यात आली.