सोलापूर: राज्य बँकेकडे ठेवली जाणारी रक्कम काढून शासकीय रोख्यात गुंतविण्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश बँकांना आर्थिक अडचणीत आणणारे ठरत असून सोलापूर जिल्हा बँकेने गुंतविलेल्या ४२५ कोटी ५० लाख रुपयांवर मार्चअखेरला साडेसहा कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
शासन व रिझर्व्ह बँकांविषयीचे धोरण बदलत असते. २०१३ पूर्वी जिल्हा बँकांना काही रक्कम राज्य बँकेत ठेवीच्या स्वरुपात ठेवावी लागत असे. यात बदल करुन रिझर्व्ह बँकेने बँकांच्या ठेवीच्या प्रमाणात रक्कम शासकीय रोख्यात गुंतविण्याचे आदेश काढले. त्या आदेशानुसार बँका शासकीय रोख्यात गुंतवणूक करतात.
या रकमेवर बँकांना व्याज मिळते; मात्र या पैशाचे मूल्य शेअर बाजाराप्रमाणे कमी-अधिक होते. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मार्च २०१८ ची शासकीय रोख्यातील गुंतवणूक ४२५ कोटी ५० लाख इतकी होती. मार्च महिन्यात या रकमेचे बाजारमूल्य कमी झाल्याने ६ कोटी ५० लाख रुपये बँकेच्या नफ्यातून तरतूद करावी लागली. अगोदरच जिल्हा बँक आर्थिक अडचणीतून जात असताना हा शासकीय भारही सहन करावा लागत आहे.
गुंतवणुकीचे मूल्य- सध्या जिल्हा बँकेची शासकीय रोख्यात ४०७ कोटी १० लाख रुपये इतकी गुंतवणूक असून शेअर बाजाराशी निगडीत असलेल्या शासकीय रोख्याचे मूल्य कमी झाल्याने आज २२ कोटी ८८ लाख रुपयाने कमी झाले आहे. या गुंतवणुकीचे मूल्य ३८४ कोटी २२ लाख रुपये इतके झाले आहे.