सोलापूर : सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत असणारे घरफोडी, मोबाईल चोरी आणि इतर चोºयांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करताना या प्रकरणातील गुन्हे उघडीस आणण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा. त्याच बरोबर चोरीला गेलेला माल परत मिळवून तो मूळ मालकांना देण्याची प्रक्रीया गतीने राबविण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकपाणी व राज्य शासनाच्या विविध योजनांचा व कायदा व सुव्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज बहुउद्देशीय सभागृहात घेतला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, खासदार शरद बनसोडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील उपस्थित होते.
गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारी वकील आणि पोलीस यांनी समन्वयाने काम करावे. सामान्यांचा विश्वास पोलीस यंत्रणेवर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस विभागातील वरिष्ठांनी सामान्य कर्मचाºयांशी सुसंवाद ठेवावा. सोलापूरमधील पोलीस वसाहतींचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबरोबरच पोलीसांसाठी मालकी हक्कांच्या घरांची योजना राबविण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या. यावेळी महसूल, पोलीस, सार्वजनिक आरोगय, न्यायालयीन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.