यापूर्वीच्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या निकषात बदल करून तीन वर्षांसाठी पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना गतवर्षी लागू करण्यात आली. बदललेल्या निकषांमुळे सोलापूर जिल्ह्यातील एकाही महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याचा पात्र लाभार्थी ठरला नाही. सोलापूर जिल्ह्यातील २४,८९६ शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडे विमा रकमेच्या हप्त्यांपोटी १० कोटी ७४ लाख रुपये भरले होते . एकाही शेतकऱ्याला योजनेचा लाभ झाला नाही. याउलट त्यांनी भरलेली रक्कम बुडाली.
नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. विशेषतः फळपीक शेतीचे खराब हवामान आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे नुकसान झाल्यान शेतकऱ्यांना विमा कवच मिळाल्यास आर्थिक आधार होऊ शकतो. दुष्काळी स्थिती अथवा पावसाचा पडणारा खंड यापूर्वीच्या विमा योजनेत नुकसानभरपाईसाठी ग्राह्य धरला जात होता. नव्या योजनेत पावसाचा खंड हा निकषच काढून टाकला आहे. त्याचा मोठा फटका फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
---------
सर्वाधिक पाऊस तरीही लाभ नाहीच
गतवर्षी जिल्ह्यात १५ ऑक्टोबरअखेर ५२६ मिमी पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत मागील १० वर्षांपेक्षा सर्वाधिक म्हणजेच ७४८ मिमी पाऊस झाला. फळपिकांची हानी झाली. जिल्ह्याच्या ९१ मंडलात सलग पाच दररोज २५ मिमी पावसाची नोंद नाही. त्यामुळे जिल्ह्यातून एकही शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरला नाही. यापुढच्या दोन वर्षांत हीच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांना पीक विम्याची आशा सोडावी लागणार आहे.
-------
यंदा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही हे खरे आहे. आगामी वर्षांसाठी नवीन अर्ज घेऊ नका, अशा वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शक सूचना आहेत. कदाचित योजनेचे निकष बदलतील, असे वाटते.
- रवींद्र माने , जिल्हा कृषी अधीक्षक , सोलापूर
--------
विधिमंडळ अधिवेशनात मी या फळपीक विम्याच्या जाचक अटींमुळे कोणत्याच शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार नाही याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. पुढे काय झाले याची माहिती घेतो.
- सचिन कल्याणशेट्टी, आमदार,अक्कलकोट
-------
सन २०२०-२१ मध्ये सहभागी शेतकऱ्यांची माहिती
- सहभागी शेतकरी : २४,८९६
- पीक विमा संरक्षित क्षेत्र : १७,०१२.६५ लाख
- शेतकरी हिश्श्याची रक्कम : १०७४.१६ लाख
- विमा संरक्षित रक्कम : २१४६२.९९ लाख
-----------