काही दिवसांपूर्वी पंढरपूरमधील एका इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये एक पालक दहावी पास झालेल्या आपल्या पाल्याचा दाखला आणण्यासाठी जाताच मुख्याध्यापक व क्लार्कने मागील दोन वर्षाचं रेकॉर्ड काढून तुम्हाला सगळी थकीत फी भरावी लागेल आणि मगच दाखला मिळेल, असं ठणकावून सांगितलं. त्यावर त्या पालकाने कोरोनाच्या कालावधीतील फी वसुली करता येणार नाही, असे सरकारने अनेक वेळा घोषित केले आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. तुम्हाला ही तसे करता येणार नाही, असं सांगत सरकारच्या घोषणेवर बोट ठेवले. त्यावर वसुलीत पटाईत असलेल्या मुख्याध्यापकांनी क्षणाचाही विलंब न करता ‘त्यांना घोषणा करायला काय जातंय. सरकार तसंच सांगत असतंय; पण आम्हाला लेखी आदेश काढत नाही. आता बघा ना वीजबिलाबाबतही सरकारने तसंच अनेकवेळा सांगितले होतं. झालं का बिल माफ.. नाही ना..?’ असा प्रतिप्रश्न पालकांना केला. मग हे कसं माफ होईल.. चला भरा पैसे म्हणून सांगताच पालकांची बत्ती गुल झाली.
- मोहन डावरे
----