सोलापूर : दहिहंडीमधील गाेविंदांना आरक्षण, डीजेला १२ वाजेपर्यंत परवानगी अशा नकाे त्या विषयांवर संवेदनशील असलेले सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल असंवेदनशील आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे येथील साखर आयुक्तालयावर माेर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. शेट्टी म्हणाले, राज्यातील साखर कारखाने उसाच्या गाळपात १० ते १२ टक्के काटा मारतात. मागील वर्षीचा विचार केला तर किमान १ काेटी ३२ लाख टनाची चाेरी झाली. याचा राज्यातील साखरेतील दराेडखाेरांनी साडेचार हजार काेटी रुपयांची चाेरी केली. साखर कारखान्यांनी ३२०० ते ३३०० रुपये प्रतिक्विटंल दराने साखरेची विक्री केली. या व्यतिरिक्त इथेनाॅलची विक्री माेठ्या प्रमाणावर झाली. यातून मिळालेल्या उत्पन्नातून किमान २०० रुपये जादा देणे शक्य आहे. हा पैसा मिळालाच पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
--
कृषीमंत्री जास्त अनुभवी असल्यासारखे वाटते, सत्तार यांना टाेला
राज्यातील नव्या सरकारने १०० दिवस पूर्ण केले. सरकारची कामगिरी समाधानकारक नाही. अतिवृष्टीमुळे ऊस वगळता एकही पीक शिल्लक राहिलेले नाही. आम्ही शिवारात फिरताे, आम्हाला वस्तुस्थिती माहिती आहे. मात्र कृषीमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असे सांगत आहेत. कदाचित त्यांना आमच्यापेक्षा जास्त कळतं, असा टाेला शेट्टी यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना लगावला.
---
महाआघाडीचे खायचे अन् दाखवायचे दात वेगळे
महाविकास आघाडी सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भाजप सरकारच्या काळात देशात ७०० शेतकऱ्यांची हत्या झाली. त्यामुळे या दाेनपैकी काेणासाेबतच आम्ही जाणार नाही. निवडणुका लढविणे हा आमचा धंदा नाही. आम्ही केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न साेडविण्यासाठी सभागृहात लाेकप्रतिनिधी हवेत म्हणून निवडणुका लढविल्या, असेही शेट्टी म्हणाले.
-----